
कुडाळ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत बांबुळी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित 'कला महोत्सव २०२५' मध्ये पारंपरिक आकाश कंदील आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन श्री देवी सातेरी मंदिरात करण्यात आले होते. गावातील कलागुणांना वाव देण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे असल्याचे मत सरपंच श्री. प्रशांत परब यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी बोलताना सरपंच श्री. प्रशांत परब यांनी ग्रामस्थांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन हा कला महोत्सव आयोजित केला, असे सांगितले. मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाचा उद्देश सफल करण्याच्या दृष्टीने हे आयोजन महत्त्वपूर्ण ठरले.
या महोत्सवात रांगोळी स्पर्धेत १२ आणि पारंपरिक आकाश कंदील स्पर्धेत १५ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कला क्षेत्रातील परीक्षक श्री. महेश राऊळ आणि प्राध्यापक नितीन बांबार्डेकर (बॅ. नाथ पै अध्यापक महाविद्यालय, कुडाळ MIDC) यांनी या स्पर्धांचे परीक्षण केले.
प्रथम: कु. राहुल राजाराम सावंत
द्वितीय: कु. सर्वेश राजाराम मेस्त्री
तृतीय: कु. मनस्वी शंकर परब
विजेते (रांगोळी स्पर्धा):
प्रथम: सौ. स्मिता शशांक परब
द्वितीय: श्री. सचिन धोंडी बांबुळकर
तृतीय: कु. दियाशा परब
बक्षीस वितरण सोहळा:
बक्षीस वितरण समारंभाला सरपंच माननीय प्रशांत परब, उपसरपंच सुभाष बांबुळकर, पंचायत समिती माजी सभापती श्री. अभय परब, देवस्थान मानकरी श्री. भुजंग परब, श्री. रघुनाथ परब, श्री. शरद परब, मुख्याध्यापक श्री. मारुती गुंजाळ आणि ग्रामविकास अधिकारी कु. प्रणाली रूपवते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आकाश कंदील स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ₹ १,०००/-, ₹ ७००/- आणि ₹ ५००/- रोख रक्कम, तर रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांनाही अनुक्रमे ₹ १,०००/-, ₹ ७००/- आणि ₹ ५००/- रोख रक्कम व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. सहभागी स्पर्धकांनाही रोख स्वरूपात बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतीने 'माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत "प्लॅस्टिक मुक्त गाव करूया आणि कापडी पिशवी वापरूया" या ब्रीदवाक्यानुसार प्रत्येक घरपट्टी धारकाला कापडी पिशव्यांचे वाटप केले. तसेच, गावातील किशोरवयीन गटातील मुलींना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. मान्यवरांनी स्पर्धकांना शुभेच्छा देत, अशा उपक्रमांद्वारे आई-वडिलांचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपसरपंच सुभाष बांबुळकर यांनी मानले.










