
कुडाळ : कुडाळ - मालवण या प्रमुख राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्डयांच्या निषेधार्थ आज माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने होबळीचा माळ येथे जनआंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाला कुडाळ मालवण वासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या रस्त्यावरून बैलगाडी चालवत नेऊन आणि महायुती सरकार विरोधी घोषणा देऊन जनतेला खड्डयात घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आला.जनता खड्यात सत्ताधारी सुशेगात, खड्डयांमधून महायुती सरकार अजून किती बळी घेणार, कुडाळचे आमदार मुंबईत व्यस्त कुडाळ मालवणची जनता खड्डयांनी त्रस्त, अधिकारी तुपाशी जनता खड्डयाशी अशा आशयाचे फलक यावेळी झळकविण्यात आले.
कुडाळ मालवण हा प्रमुख राज्यमार्ग असून गेल्या सहा महिन्यांपासून हा रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला आहे. वाहन चालकांसाठी तो मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागत असून रस्त्यावरून चालणे देखील नागरिकांना मुश्कील झाले आहे.या रस्त्यावर वारंवार अपघात होऊन नागरिक गंभीर जखमी होत आहेत.मात्र स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री हे सुशेगात असून कुडाळ मालवण वासिय नागरिकांच्या जीविताची त्यांना कोणतीही फिकीर नाही. त्यामुळे सुशेगात असलेल्या स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री आणि महायुती सरकारला जाग आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, मी आमदार असताना आवश्यक निधी मंजूर करून हा कुडाळ मालवण रस्ता सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु महायुती सरकार आल्यानंतर गेल्या साडेतीन वर्षात कुठलाही निधी या रस्त्यावर खर्च झाला नाही.त्यामुळे हा रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला असून सातत्याने अपघात घडत आहेत. लोक मृत्युमुखी पडत आहेत जखमी होत आहेत. हा एकच रस्ता नाहीतर कसाल-मालवण, कणकवली-आचरा, आचरा-मालवण, कवठी, चेंदवण, माणगाव हे सगळे रस्ते खड्डेमय झाले आहेत. मात्र सत्ताधारी लोकप्रतिनिधींना या रस्त्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. स्थानिक आमदार निलेश राणे हे मालवण वरून कुडाळला जायचं असेल तर हायवेवरून जातात परंतु कुडाळ मालवण रस्त्याने ते जात नाहीत हे त्यांच्याकडे असलेल्या एका पोलीस बॉडीगार्डने मला सांगितले.त्यामुळे रस्ता दुरुस्त करण्याऐवजी आमदार पळवाट काढत आहेत. जनता त्रस्त झाल्याने आम्ही जनतेसाठी हे आंदोलन केले परंतु आता आमच्यावरच गुन्हे दाखल केले जातील.परंतु जनतेचा आवाज उठवण्याचे काम आम्ही सातत्याने करत राहणार आहोत. माझी स्थानिक आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांना विनंती आहे की त्यांनी हिंदुत्वाचा विषय घ्यावा, उद्धवजी ठाकरेंवर टीका करावी आमच्यावर टीका करावी, मतांची देखील चोरी करावी परंतु आमदार, खासदार, पालकमंत्र्यांना जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा त्यांनी या कुडाळ-मालवण रस्त्यावरून प्रवास करावा आणि ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले ते लोक सुरक्षित राहिले पाहिजे असे तुम्हाला वाटले तर हा रस्ता लवकरात लवकर सुस्थितित करावा असा विनंतीवजा टोला वैभव नाईक यांनी लगावला.
यावेळी अमरसेन सावंत,मंदार शिरसाट,हरी खोबरेकर,राजन नाईक,नितीन वाळके,बाबी जोगी,पराग नार्वेकर,सुशील चिंदरकर, शेखर गावडे,विनय गावडे,गंगाराम सडवेलकर,समीर लब्दे,विजय पालव,नितीन सावंत,अमित भोगले, संदीप म्हाडेश्वर,अमित राणे, बाबू टेंबुलकर, वंदेश ढोलम,शिवा भोजने, दर्शन म्हाडगूत,रुपेश वर्दम,महेंद्र म्हाडगूत,हेमंत मोंडकर,तपस्वी मयेकर,उमेश मांजरेकर,दीपक देसाई,नरेश हुले,मंगेश बांदेकर,रुपेश वाडयेकर, गौरव वेर्लेकर,बंड्या सरमळकर,विनोद सावंत,उमेश प्रभू, शंभू नाईक, प्रवीण नेरुरकर,संतोष कुडाळकर,अजित हडकर,गोटू नाईक,देविदास नाईक,दाजी नाईक,सुनील करवडकर, मंगेश नारिंगेकर,दीपेश कदम, राजू परब,मोनिका म्हापणकर,सुजाता परब, जागृती भोले, दीपिका म्हापणकर, मालती परब, दिव्या परब, राजश्री म्हापणकर, गौरी परब, मितालि कदम, स्मिता म्हापणकर,हर्षदा मालवणकर,ममता परब,साक्षी परब, प्रज्ञा परब, समीक्षा परब, साधना चव्हाण,अनिता परब, कोमल मालवणकर,शिवनंदन प्रभू,राहुल सावंत,उमेश चव्हाण, बाबू कांबळी,नितीन राऊळ आदीसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व कुडाळ मालवण वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.













