कुडाळमध्ये उमेदच्या प्रशिक्षण केंद्राची मागणी

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 27, 2025 16:42 PM
views 26  views

सिधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत माणगाव तालुका कुडाळ येथे प्रशिक्षण केंद्र प्रस्ताव शासनास सादर करावा अशी मागणी, कुडाळ मालवण आमदार निलेश राणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्याकडे सादर केली असून याबाबत आपण जिवन्नोती अभियानच्या संबंधितांशीचर्चा करून सदरचे प्रशिक्षण केंद्र मंजूर होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करू असे आश्वासित केले.

कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यामध्ये अनेक गावातील बचत गट कार्यरत आहेत. या भागातील महिला बचत गटांसाठी प्रशिक्षण केंद्र व्हावे अशी येथील बचत गटांच्या महिलांची सातत्याने मागणी होत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत शेकडो बचतगट कार्यरत असून, सदरील बचतगटांच्या सक्षमीकरण मार्गदर्शनासाठी प्रशिक्षण केंद्र आवश्यक आहे. या केंद्रासाठी माणगाव ता. कुडाळ येथे जागेची उपलब्धता असून तसा प्रस्ताव आपल्या स्थरावरून शासनास सादर करून झालेल्या कार्यवाहीचा अहवाल माझ्या अवलोकनार्थ सादर करावा,अशी ही मागणी त्यांनी केली आहे.

याबाबतची निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देऊन लक्ष वेधले यावेळी आमदार निलेश राणे यांचे स्विय सहाय्यक योगेश घाडी, कुडाळ तालुकाप्रमुख दीपक नारकर, राजा गावडे, माणगाव विभाग प्रमुख सचिन धुरी, राजन परब आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.