
कुडाळ : शहरातील श्रीरामवाडी येथे मुंबई - गोवा महामार्गालगत पॅलेस हॉटेलच्या मागे सोमवारी रात्री सुमारास दहाच्या दरम्यान लागलेल्या आगीने एका घराचे मोठे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेत घरातील कपाट, छप्पर तसेच टीव्ही, फ्रिज यांसारखे गृहउपयोगी साहित्य जळाले
अमोल निकम यांच्या मालकीच्या या घरात आग लागली तेव्हा ते कामानिमित्त बाजारात गेले होते. घरात कोणीही नसल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र अचानक घरातून धूर निघताना दिसल्याने शेजाऱ्यांनी तत्काळ सतर्कता दाखवली. त्यांनी निकम यांना फोन करून ही माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच निकम घटनास्थळी धाव घेतली आणि शेजाऱ्यांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. नागरिकांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आली आणि पुढील मोठे नुकसान टळले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीत अमोल निकम यांचे काही प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, स्थानिकांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे.