
कुडाळ : नवरात्र उत्सवाचे औचित्य साधत बुधवार, दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी रोटरी क्लब ऑफ कुडाळ व नॅब आय हॉस्पिटल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील लक्ष्मी मंदिर परिसरात नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व निदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे ७५ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीस आलेल्या रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय मार्गदर्शनाची सुविधा पुरविण्यात आली.
शिबिरासाठी उपस्थित राहिलेल्या डॉक्टर व त्यांच्या टीमसाठी नाश्ता व जेवणाची सोय रोटरी सदस्य तसेच महालक्ष्मी मंदिर समितीचे अध्यक्ष रोटेरियन संजय पिंगुळकर यांनी केली. या उपक्रमासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेऊन मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमादरम्यान नॅब आय हॉस्पिटलचे अध्यक्ष रो. अनंत उचगावकर यांनी नागरिकांशी संवाद साधत नेत्र आरोग्याविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे शिबिराचे महत्त्व अधिक वाढले.
या शिबिरास रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. राजीव पवार, सचिव रो. मकरंद नाईक, रो. राजन बोभाटे, रो. शशिकांत चव्हाण, रो. संजय पिंगुळकर आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय नगरसेविका सौ. चांदणी कांबळी, माजी नगरसेवक सचिन काळप, भाऊ पाटणकर, राजन काळप, पप्पु धुरी, शैलेश काळप, बाळा राऊळ तसेच लक्ष्मीवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ कुडाळ व नॅब आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेले हे शिबिर सामाजिक बांधिलकीची जाणीव जागवणारे ठरले.










