'प्रेरणा दिवस' उपक्रमानिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पडतेवाडी शाळेला भेट

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: September 19, 2025 21:04 PM
views 14  views

कुडाळ : जिल्हा प्रशासन आणि शाळा यांच्या मध्ये दुवा साधणे तसेच मुलांना प्रेरणा देणे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात आज प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज दुपारी जिल्हा परिषदेच्या कुडाळ-पडतेवाडी  येथील पांडुरंगशेठ  पडते विद्यालयाला भेट देऊन मुलांशी संवाद साधला. तसेच  सेवा पंधरवड्यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळा तिथे दाखल हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुद्धा राबविण्यात येत असून पडतेवडी शाळेतील काही मुलांना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वय अधिवास प्रमाणपत्रे देखील प्रदान करण्यात आली.   

प्रेरणा दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हा परिषेदेच्या कुडाळ पडतेवाडी शाळेला भेट दिली. कोकण विभागाच्या आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. त्याप्रमाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील एकेका शाळेला भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याला अनुसरून जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कुडाळ पडतेवाडी शाळेला भेट दिली. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एक शासकीय अधिकारी कसा असतो हे विद्यार्थ्यंना समजणे, मुलांनी आणि अधिकऱ्यानी एकमेकांशी संवाद साधणे, जेणेकरून विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळेल, हा या प्रेरणा दिनामागचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व राजपत्रित अधिकारी यांनी जिल्ह्यातील निरनिराळ्या शाळेला भेटी देऊन मुलांशी संवाद साधल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.  यानिमित्ताने जिल्हा प्रशासन आणि शाळा यांच्या मध्ये काही गॅप असेल तर ती देखील भरून येण्यासाठी मदत होणार असल्याचे श्रीमती धोडमिसे यांनी सांगितले. यावेळी काही  मुलांना वय अधिवास दाखले वितरित करण्यात आले. 

शाळा तिथे दाखला उपक्रम

सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनामार्फत शाळा तिथे दाखले उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली. विद्यार्थी भविष्यात महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतात किंवा नोकरीसाठी त्यांना वेगवगळ्या प्रकारचे दाखले लागतात. या दाखल्यांमध्ये वय अधिवास आणि जातीचा दाखला हे दोन महत्वाचे दाखले आहेत. दाखले काढण्याची प्रक्रिया खूप किचकट असते.  त्यासाठी हेलपाटे मारावे लागतात असे बोलले जाते. या सगळ्याचा विचार करून सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने शाळा तिथे दाखले हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील पहिली ते दहावी पर्यंतच्या जेवढ्या शाळा आहेत त्या सर्व शाळामंध्ये प्रशासन स्वतः जाऊन दाखले वितरित करत आहे. यासाठी शिक्षण विभाग आणि महसूल विभाग समन्वयाने काम करत आहेत. मुलांचे आवश्यक कागदपत्रांसहित अर्ज भरून घेणे आणि ते अर्ज महसूल विभागाला सादर करणे हि जबाबदारी शिक्षण विभागाने उचलली आहे. तर महसूल विभाग या कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांना जातीचे आणि वय अधिवास दाखले एक ते दोन दिवसात देत आहेत. पूर्ण सेवा पंधरवड्यात हा कार्यक्रम राबविला जाणार असून जिल्हयातील १०० टक्के शाळांमधील मुलांना हे दाखले देण्याचे उद्दिष्ट असल्याचे श्रीमती धोडमिसे यांनी सांगितले. 

यावेळी प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळूशे, तहसीलदार वीरसिंग वसावे, नायब तहसीलदार नागेश शिंदे, अमरसिंह जाधव, मंडळ अधिकारी श्री. मसुरकर, तसेच पडतेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम, तसेच माधवी सावंत, शुभलक्ष्मी सावंत, गीतांजली सावंत, सुविद्या चव्हाण, मिताली तळेकर, प्राची भोगटे, लक्ष्मण आगलावे, अदिती राणे, परिणी बगळे, वैष्णवी केळुसकर, वैदेही गोसावी, शिल्पा राणे, स्नेहल दळवी, मधुराराणी परब, कृष्णा गावडे, सरिता परब, शिक्षक आणि पालक उपस्थित होते.