
कुडाळ : गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे कुडाळबाजार पेठेत खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. बाप्पाच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी सर्व दुकाने गजबजून गेली आहेत.
गणपतीची माटवी सजवण्यासाठी बाजारात हरणाची फुले, कांगल, बेड, कवंडाळ आणि तवशी अशा सजावटीच्या वस्तूंसाठी विशेष गर्दी होत आहे. पारंपारिक वस्तूंची मागणी वाढल्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेश चतुर्थीसोबतच हरतालिकेच्या पूजेसाठी लागणाऱ्या सामानाचीही खरेदी सुरू झाली आहे. हरतालिकेच्या मूर्ती, शहाळी आणि केळी मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत. यामुळे बाजारपेठेत सर्वत्र चैतन्य दिसत आहे. येत्या काही दिवसांत ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाप्पाच्या स्वागतासाठी कुडाळनगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे.