
कुडाळ : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, कुडाळ आयोजित “चला खेळूया मंगळागौर” हा श्रावणमास विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या श्रावण विशेष कार्यक्रमासाठी अभिनेत्री श्रद्धा खानोलकर, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर आणि भाजप प्रदेश सदस्या संध्या तेरसे यांची मुख्य उपस्थिती होती. तसेच शहर अध्यक्षा मुक्ती परब, कुडाळ मंडल अध्यक्षा आरती पाटील, ओरोस मंडल अध्यक्षा सुप्रिया वालावलकर, नगरसेविका अक्षता खटावकर, नगरसेविका आफ्रीन करोल, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका ज्योती जळवी, ममता धुरी, साधना माडये, अदिती सावंत, प्रज्ञा राणे, शिल्पा घुर्ये, साक्षी सावंत, रेखा काणेकर यांच्यासह भाजप महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री पुरस्कारप्राप्त अभिनेत्री श्रद्धा खानोलकर, अध्यक्षा श्वेता खानोलकर, प्रदेश सदस्या संध्या तेरसे यांची हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी अभिनेत्री श्रद्धा खानोलकर म्हणाल्या की, मंगळागौर हा सण महिलांसाठी विशेष असतो. यातून महिला एकत्र येतात, त्यामुळे असे खेळ आपण जपले पाहिजेत. भाजपच्या महिला मोर्चाने हा स्तुत्य कार्यक्रम आयोजित करून महिला वर्गाच्या सुप्त गुणांना वाव दिला आहे.
यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना म्हटले की, मंगळागौर कार्यक्रमाचा आनंद घ्या. अशा खेळातून आपल्यातील कलागुण समजतात. त्यांना वाव देणे महत्त्वाचे आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना आणल्या आहेत. याचा बहिणींनी फायदा घ्यावा. आमचे लाडक्या देवाभाऊंसाठी आशीर्वाद आहेत. आज महिला प्रत्येक ठिकाणी यश संपादन करीत आहेत. लाडक्या बहिणींना मानाने समाजात सन्मान मिळावा यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. मंगळागौर कार्यक्रम हा त्याचाच भाग आहे. ३० ते ४० वर्षांपूर्वी माहेरची खुशाली मिळत नव्हती. त्यावेळी मंगळागौरच्या माध्यमातून गप्पा रंगत आणि खेळ खेळले जात. पण आता काळ बदलला. मात्र, मंगळागौर सण अजूनही महिला वर्गात आवड निर्माण करून आहे. यावेळी भाजप प्रदेश सदस्या संध्या तेरसे यांनी सुद्धा मंगळागौरची महती सांगताना महिलांना समाजात मानाचे स्थान निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. लाडक्या बहिणींवर देवाभाऊंचे विशेष लक्ष असून बहिणींचा विकास झाल्यास समाजाचाही विकास होईल, असे सांगितले. मंगळागौर कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी एकत्रित येऊन आपले सुप्त गुण बाहेर आणावेत, असे आवाहन केले.
या मंगळागौर विशेष कार्यक्रमात उखाणा, पोवाडा, गोफ नृत्य, लकी ड्रॉ, गणेश वंदन, फुगडी, झिम्मा, जागर, हळदीकुंकू आदी मंगळागौर विशेष खेळ खेळण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाच्या वेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश सदस्य अनिल उर्फ बंड्या सावंत, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, रूपेश कानडे, श्रीपाद तवटे यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाडक्या बहिणींकडून “राख्या” प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.