
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ कळसुली दुर्गनगर-पवारवाडी या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम पुन्हा नव्याने करण्यात यावे अशी मागणी सोनवडे तर्फ कळसुली ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कुडाळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या रस्त्याच्या कामाबाबत उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील घोटगे-सोनवडे दुर्गनगर पवारवाडी या रस्त्याचे हे संबंधित अधिकारी आणि कॉन्ट्रक्टर यांच्या मनमानी व दुर्लक्षामुळे सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे, असा आरोपही निवेदनाद्वारे ग्रामपंचायतने केला आहे. सदर कॉन्ट्रक्टर व अधिकारी यांना रस्त्याचे काम सुरु असताना ग्रामपंचायतीने वेळोवेळी चुका निदर्शनास आणून दिल्या होत्या. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून काम सुरु ठेवण्यात आले. त्यामुळेच आज रस्त्याची दुरावस्था झालेली आहे.
या रस्त्याची साईडपट्टी, डांबरीकरणाचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्याला भेगा जाऊन एसटी बस वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याच्या वळणांच्या ठिकाणी आवश्यक तेथे रस्ता मजबुतीकरण, खडीकरण डांबरीकरण न केल्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. तसेच वंजारे ठिकाणाच्या मोरीजवळ गटार बांधकाम हे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे भातशेतीचेही नुकसान झाले.
सदर स्स्त्यावरील ब्रिज बांधकामासाठी त्यावेळी ओहोळाच्या दुतर्फा भातशेती जमिनीच्या कडा तोंडण्यात आल्या होत्या. मात्र, त्याठिकाणी पक्के बांधकाम न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम पुन्हा नव्याने करण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.