
कुडाळ : घावनाळे स्वामी समर्थ महाराज यांच्या मठात दर गुरुवारी भक्तांची मांदियाळी जमते. स्वामींची भक्ति रसात रमलेले भक्त नामस्मरण, आरती करून स्वामींच्या चरणी नतमस्तक होतात. स्वामींच्या मठात वेगवेगळे उपक्रम कायम होत असतात. ओम श्री स्वामी समर्थ जगद्माता मंडळ तर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील गुरुवर्य माउलींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबीर मठामध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 56 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली ही सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण केली. या शिबिरात हृदयरोग तपासणी, युरोलॉजी तपासणी, जनरल तपासणी, अस्थीरोग तपासणी, कर्करोग तपासणी, दंतरोग चिकित्सा, नेत्र तपासणी, नेफ्रलॉजी तपासणी, स्त्रीरोग तपासणी, ecg, bsl इत्यादी तपासणीचा समावेश होता. आरोग्य तपासणी शिबिराचा 72 जणांनी लाभ घेतला.
या संपूर्ण शिबिरामध्ये एस एस पी एम कॉलेज पडवे., ब्लड बँक शाखा ओरोस., सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा वेंगुर्ला आणि ग्रामीण रुग्णालय कुडाळ यांनी सहकार्य केले. स्वामींच्या मठ व मंडळ तर्फे गुरुमाऊली यांनी आरोग्यशिबिरात सहभागी डॉक्टर, कर्मचारी, रक्तदाता यांचे आभार मानले.