
सावंतवाडी : रूग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मोती तलाव काठी पर्यटन महोत्सवाची झलक दिसून आल्याने यंदा 'सावंतवाडी पर्यटन महोत्सव' भव्य स्वरूपात होईल अशा अपेक्षेत असणाऱ्या सावंतवाडीकर जनतेचा हिरमोड झाला आहे. मिनी महोत्सवाची मर्यादीत क्षमता बघता 'इयर एंड' साठी सावंतवाडीतला रसिक अन् दर्दी प्रेक्षक शेजारील गोवा राज्यासह कुडाळ, कणकवलीचा पर्याय निवडत आहे. पाच वर्ष सावंतवाडीच्या जिव्हाळ्याचा महोत्सव होत नसल्याची खंतही नागरिकांकडून बोलून दाखविली जात आहे.
सावंतवाडी शहराचा पर्यटन महोत्सव म्हणजे संपूर्ण जिल्ह्यासह शेजारील गोवा राज्यातील दर्दी रसिकांसाठी पर्वणीच. सिनेतारे, बडी स्टारकास्ट या निमित्ताने सावंतवाडीत अवतरायची. हजारो पर्यटक येत असल्याने मोठी उलाढाल व्हायची. मात्र, मागील पाच वर्षांत सावंतवाडीकरांच हे सुख हिरावून घेतलं गेलं आहे. मध्यंतरी महोत्सवाच्या ठिकाणी माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवशी रूग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उभारलेल्या शामियानातून पर्यटन महोत्सवाची झलक दिसून आली. त्यामुळे यंदा 'सावंतवाडी पर्यटन महोत्सव' भव्य स्वरूपात होईल अशी अपेक्षा होती. मात्र, पदरी निराशाच पडली. सावंतवाडी नगरपरिषदेवर प्रशासकीय राजवट असल्याचे मुख्य कारण याला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मिनी महोत्सवाच आयोजन जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान समोर करण्यात येत आहे.
मात्र, येथील जागेची क्षमता बघता अनेकांनी पर्याय शोधला आहे. शेजारील पेडणे तालुक्यासह गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात इयर एंड होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हौशी लोकांनी गोवा राज्यात जाण पसंत केल्याचं दिसत आहे. तसेच कुडाळ, कणकवली येथेही उत्सव होत असल्याने तो पर्याय निवडला आहे. २०२५ च जल्लोषात वेलकम केलं जाणार असून यंदाच वर्षही सावंतवाडी पर्यटन महोत्सवाच्या आठवणीतच जाणार आहे.
आर्थिक उलाढाल कोलमडली
शहरात होणाऱ्या या महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात रसिक येत. विविध संस्कृती, परंपरांचे व ठिकठिकाणचे स्टॉल इथे लागत. यात खाद्य मेजवानी विशेष असायची. मात्र, मिनी स्वरूपात मर्यादा आल्यानं शहरात होणारी मोठी आर्थिक उलाढाल देखील होणार नाही आहे. याचा शहरातील इतर पुरक व्यवसायिकांना फटका यंदाही बसणार आहे.
मिनी महोत्सवातून मनोरंजन !
कोरोनानंतर महोत्सवाची उणीव सामाजिक संस्थांनी भरून काढली. गेली दोन वर्षे सांस्कृतिक मेजवानी त्यांनी सावंतवाडीकरांना दिली.या मिनी महोत्सवात सावंतवाडीकरांनी समाधानही मानून घेतलं. यंदाही रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी, इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी आणि दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'सावंतवाडी मिनी महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या महोत्सवाची उणीव भरून काढत स्थानिकांच मनोरंजन येथे होणार आहे. निदान पुढच्या वर्षी तरी सावंतवाडीचा पर्यटन महोत्सव होईल या अपेक्षेत २०२४ ला निरोप देण्यासाठी शहरवासीय सज्ज झाले आहेत.