कुडाळ ते बाव रस्त्याचे काम बंद ! ; ठाकरे शिवसेना आक्रमक

दोन दिवस काम करुन ठेकेदाराने रस्त्याचे काम पाडले बंद
Edited by:
Published on: January 10, 2025 19:07 PM
views 101  views

कुडाळ : कुडाळ ते बाव या रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, कुडाळ उदासीन असल्याचे दिसून येतेय. २४ डिसेंबर २०२४ रोजी बाव-बांबुळी, कविलकट्टा येथील नागरिकांनी कुडाळ ते बाव या रस्त्याच्या दूरवस्थेबाबत लक्ष वेधले होते. त्यानुसार, १ जानेवारी २०२५ पासून सदर रस्त्याचे काम सुरू होईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आले.

त्यानुसार १ आणि २ जानेवारी रोजी रस्त्याचे काम सुरू झाले. पण पुन्हा ३ जानेवारीपासून या रस्त्याचे काम ठेकेदाराकडून बंद करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या हलगर्जीपणामुळे आज सकाळी कुडाळ, कविलकट्टा, बांबुळी आणि बाव येथील ठाकरे शिवसेना आणि नागरिकांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन तीव्र छेडले. अखेर या रस्त्याचे काम १३ जानेवारीपासून पुन्हा सुरू होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले.

यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले. जर १३ जानेवारीपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास पुन्हा एकदा एकदा आंदोलन केले जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. तसेच जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील असे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.