कुडाळ तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी, राजा सामंत, अनिकेत उचले पुरस्काराचे मानकरी
Edited by:
Published on: January 06, 2025 18:33 PM
views 100  views

कुडाळ : कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या  पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार विजय शेट्टी यांना, कै. वसंत दळवी ग्रामीण वार्ताहर पुरस्कार दैनिक तरुण भारत संवादचे राजा सामंत यांना तर व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती छायाचित्रकार पुरस्कार दैनिक पुढारीचे अनिकेत उचले यांना जाहीर झाला आहे. 

कुडाळ तालुका पत्रकार समितीची सभा नुकतीच तालुका अध्यक्ष निलेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत हे पुरस्कार निश्चित करण्यात आले. व्याधकार  ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार विजय शेट्टी याना देण्यात  येणार आहे. विजय शेट्टी हे सध्या कोकण नाऊ चॅनेलचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. त्यापूर्वी  गेली तीस वर्षे विविध दैनिकात काम करताना विजय शेट्टी यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. शालेय जीवनापासून ते राष्ट्रसेवा दल, छात्र भारती ,अंधश्रद्धा निर्मूलन समिती या चळवळीशी निगडित राहिले आहेत. कॉलेज जीवनात विद्यार्थी पुरोगामी चळवळीत काम करत असताना उत्कृष्ट संघटना कौशल्यासाठीचा राज्यस्तरीय पहिला डॉक्टर अरुण लिमये पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. १९९० मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारसह अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.वर्तमानपत्रातून त्यांनी "ताजा कलम" "सर्च लाईट" या सदरात तीस वर्ष  सातत्याने लेखन केले आहे. ."नावांच्या गावा!" " दीपज्योती नमोस्तुते !"  "आडनामायन ", "गजालीतील दिवस  !गजालीतील माणसे!", "गुरवे नमः " "आम्ही बॅचलर!" सारखी  वाचकांचा लेखन सहभाग मिळालेली  प्रदीर्घ काळ चाललेली सदरे त्यांनी चालविलेली आहेत. 

कै. वसंत दळवी ग्रामीण वार्ताहर पुरस्कार दैनिक तरुण भारत संवादचे राजा सामंत यांना जाहीर झाला आहे. राजन दिनकर सामंत उर्फ राजा सामंत हे  गेली अनेक वर्षे दैनिक तरुण भारत साठी नेरूर वार्ताहर म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील जनहिताच्या अनेक समस्या त्यांनी वेळोवेळी  तरुण भारतच्या माध्यमातून मांडल्या आहेत. कला, क्रीडा, दशावतार, भजन तसेच कोकणातील इतर लोककलांना त्यांनी दैनिक तरुण भारतच्या माध्यमातून सदोदित व्यासपीठ मिळवून दिले आहे. राजा सामंत हे उत्कृष्ट निवेदक आहेत. त्याचबरोबर क्रिकेट सामान्यांचे समालोचक  म्हणून देखील राज्यपातळीवर त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. ते गीतकार देखील आहेत. दशावतार कलेचे अभ्यासक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. 

व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती छायाचित्रकार पुरस्कार दैनिक पुढारीचे अनिकेत उर्फ विश्वनाथ मंगेश उचले यांना जाहीर झाला आहे. अनिकेत उचले हे कणकवलीचे.  २०१० मध्ये त्यांनी आयबीएन लोकमत वृत्त वाहिनी  पासून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यांनतर २०१२ पासून दैनिक पुढारीचे  छायाचित्रकार व पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. कणकवली सारख्या शहरात  एक छायाचित्रकार म्हणून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली.  यासोबतच पत्रकार क्षेत्रात विविध वृत्तपत्रांना छायाचित्र पुरविणे व शहरातील विविध विषयांवर छायाचित्राच्या माध्यमातून ते वृत्त प्रसिद्ध करतात.  दैनिक पुढारीच नव्हे तर इतर वृत्तपत्रांना देखील ते छायाचित्र पुरवत असतात. कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट छायाचित्रकार  पुरस्कार तसेच  जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार देखील त्यांना प्राप्त आहे. आंबोळी टाइम्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील ते विविध विषय  हाताळत असतात. कणकवली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणून  ते कार्यरत आहेत. 

या पुरस्कारांचे वितरण फेब्रुवारी महिन्यात करण्यात येणार आहे.  कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या या बैठकीला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि कुडाळचे सदस्य उमेश तोरस्कर, कुडाळच्या सचिव वैशाली खानोलकर, उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजन नाईक, ज्येष्ठ पत्रकार चंदू सामंत, विजय पालकर, रवी गावडे, प्रमोद ठाकूर, प्रमोद म्हाडगूत, अजय सावंत, विठ्ठल राणे,  विलास कुडाळकर, गुरु दळवी, रजनीकांत कदम, अरुण अणावकर, नाना बोगार, पद्माकर वालावलकर, काशीराम गायकवाड, राजाराम परब आदी पत्रकार उपस्थित होते.