कुडाळचे PI राजेंद्र मगदूम यांचा एसपींच्या हस्ते खास सन्मान

अल्पवयीन मुलीचे अपहरण - खून प्रकरण आणलं होतं उघडकीस
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: December 11, 2025 11:27 AM
views 149  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा खून करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळणारे आणि हे प्रकरण उघडकीस आणणारे कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासह त्यांच्या टीमचा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.

तालुक्यातील घावनाळे खुटळवाडी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मगदूम व त्यांचे सहकारी तपास करत होते या तपासामध्ये अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याचे उघड झाले आणि या प्रकरणी कुणाल कुंभार याला ताब्यात घेण्यात आले हे प्रकरण दीड महिन्यांमध्ये उघडकीस आणण्यात आले.

कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या केलेल्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. दहिकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविले यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अनिरुध्द सावर्डे, पोलीस अंमलदार कृष्णा केसरकर, संजय कदम, कृष्णा परुळेकर, योगेश वेंगुर्लेकर, प्रमोद काळसेकर, महेश जळवी, हरेश पाटील, सखाराम भोई, आनंद पालव, महेश भोई, समीर बांदेकर, रुपेश धोंडु गुरव, विष्णु रामदास, नितिन शेडगे, प्रणाली रासम यांचा सन्मान करण्यात आला.