
कुडाळ : कुडाळ एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशनच्या शिष्टमंडळाने गुरुवारी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची सदिच्छा भेट घेतली आणि असोसिएशनच्या वतीने ८ नोव्हेंबर रोजी कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या नियोजित सत्कार सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण दिले.
मा. उद्योगमंत्री महोदयांनी हे निमंत्रण सहर्ष स्वीकारले असून, ते या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. या महत्वपूर्ण भेटीदरम्यान आमदार निलेश राणे आणि आमदार दिपक केसरकर हे देखील उपस्थित होते. असोसिएशनचे प्रतिनिधी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर आणि कार्यवाह ॲड. नकुल पार्सेकर यांनी असोसिएशनच्या वतीने मंत्र्यांची भेट घेतली व निमंत्रण दिले.
या सत्कार सोहळ्यामुळे कुडाळ एम.आय.डी.सी. क्षेत्रातील उद्योजकांना माननीय उद्योगमंत्र्यांशी संवाद साधण्याची आणि स्थानिक औद्योगिक विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.










