'नमो उद्याना'त उमटावा कोकणी संस्कृतीचा ठसा

संध्या तेरसे यांचा कुडाळ नगरपंचायतीला मोलाचा सल्ला
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 26, 2026 19:18 PM
views 67  views

कुडाळ : कुडाळ येथील 'नमो उद्यान' प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना संध्या तेरसे यांनी उद्यानाच्या रचनेबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कल्पक सूचना मांडल्या. हे उद्यान केवळ अत्याधुनिक न राहता, त्यात सिंधुदुर्ग आणि कोकणच्या संस्कृतीचे प्रतिबिंब उमटावे, अशी आग्रही विनंती त्यांनी यावेळी प्रशासनाला केली.

स्थानिक कला आणि साधनसामग्रीचा वापर

संध्या तेरसे यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, "जर आपल्याला या उद्यानाचा राज्यात १  नंबर लावायचा असेल, तर त्यात 'नाविन्य' असणे गरजेचे आहे. हे नाविन्य साधण्यासाठी आपल्या कोकणातील स्थानिक साधनसामग्री आणि इथल्या समृद्ध कलेचा वापर उद्यानाच्या निर्मितीत व्हायला हवा. यामुळे पर्यटकांना कोकणच्या मातीचा सुगंध या प्रकल्पातून येईल." उद्यानाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी त्यांनी दोन महत्त्वाचे सल्ले दिले:

स्थानिक जाणकारांचा सहभाग: कुडाळ शहरातील अनुभवी आणि जाणकार व्यक्तींकडून उद्यानाच्या आराखड्याबाबत सल्ला घेतल्यास अधिक चांगले चित्र निर्माण होऊ शकते. खासदार नारायण राणे यांचे मार्गदर्शन: खासदार नारायण राणे यांचा विकासकामांचा प्रदीर्घ अनुभव आणि दृष्टी मोठी आहे. त्यांचा सल्ला घेतल्यास एक 'दृष्टिक्षेपात' भरेल असे देखणे उद्यान साकारता येईल, असेही त्या म्हणाल्या.