
कुडाळ : मुंबई - गोवा महामार्गावर पिंगुळी टेंबधुरी नगर येथे अपघात झाला. या अपघातात वेताळ बांबर्डे येथील युवकाचा मृत्यू झाला. प्रदीप उर्फ मनीष दीपक पेडणेकर (वय - २४, रा. वेताळ बांबर्डे, आंगणेवाडी) असे त्या युवकाचे नाव आहे. हा अपघात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर मोठी गर्दी जमली होती. यानंतर १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करून तिच्या माध्यमातून त्याला कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रदीप (मनीष) दीपक पेडणेकर हा एक खाजगी कंपनीमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कार्यरत होता. तसेच तो एक उत्कृष्ट क्रिकेटचा खेळाडू होता. वेताळ बांबर्डे येथे आयोजित केलेल्या क्रिकेटच्या टुर्नामेंटसमध्ये एक सामना खेळून कंपनीच्या कामानिमित्त तो बांदा येथे गेला होता. बांदा येथील कंपनीचे काम आटोपून घरी परतत असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. पिंगुळी टेंबधुरी नगर येथे आला असता त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्याने पुढे चालत असणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, मनीष हवेत उंच उडाला आणि दुचाकीपासून काही अंतर दूर असलेल्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळला. या अपघातात मनीष यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. यावेळी १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्याला कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती कळताच वेताळ बांबर्डे येथील ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मनीष याचा स्वभाव मनमिळावू असल्यामुळे त्याचा गावामध्ये मोठा मित्रपरिवार होता. त्याच्या निधनाने वेताळ बांबर्डे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.
आईचा आक्रोश पाहून सर्वांचे डोळे पाणावले
घटनेची माहिती मिळताच आईने ताबडतोब कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालय गाठले. "मला माझ्या मुलाला एकदा भेटू द्या" अशा शब्दात तिने आक्रोश केला. त्या माऊलीचा आक्रोश पाहून सर्वांचे हृदय पिळवटून निघाले. अनेकांनी यावेळी डोळ्यात पाणी भरले.










