
कुडाळ : कुडाळ न.पं.त महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून शहर विकासाच्या दृष्टीने अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. येत्या नवीन वर्षात कुडाळ शहर मच्छर मुक्त अभियानांतर्गत गप्पी मासे पैदास केंद्र, तसेच भटके कुत्रे पकड व निर्बिजीकरण मोहीम आणि डिजिटल अंगणवाडी असे तीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहीती सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांच्या वतीने गटनेते मंदार शिरसाट यांनी दिली.
कुडाळ येथील ठाकरे शिवसेनेच्या शाखेत मंगळवारी न.पं.तील महाविकास आघाडीच्या नगरसेवकांकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी गटनेते मंदार शिरसाट बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, बांधकाम समिती सभापती उदय मांजरेकर, नगरसेविका श्रेया गवंडे, सई काळप, श्रुती वर्दम, ज्योती जळवी, नगरसेवक संतोष शिरसाट आदी उपस्थित होते.
मंदार शिरसाट म्हणाले, न.पं.त महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून शहराच्या विकासासाठी अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. आता नव्या वर्षात मच्छर मुक्त कुडाळ अभियान शहरात राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत न.पं.च्या माध्यमातून शहरात गप्पी मासे पैदास केंद्र उभारण्यात येणार असून, शहरात ठिकठिकाणी 40 हजार गप्पी मासे सोडण्यात येणार आहे. 8 जानेवारीला पहिल्या टप्प्यात एक हजार गप्पी मासे सोडण्यात येणार असून, फेब्रुवारी-मार्च महिन्यात टप्प्याटप्प्याने गप्पी मासे सोडण्यात येणार आहेत. त्यानंतर मोफत गप्पी मासे वाटप करण्यात येणार आहेत. तसेच शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या पुन्हा वाढली आहे. या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी यापूर्वीही कुत्रे पकड व निर्बिजीकरण मोहीम राबविण्यात आली होती. आता पुन्हा ही मोहीम राबविण्यात येणार आहे, असे श्री.शिरसाट यांनी सांगितले. त्याचबरोबर शहरात 14 अंगणवाडी शाळा असून 200 हून अधिक मुले शिकत आहेत. या मुलांसाठी एका अंगणवाडीत डिजिटल अंगणवाडी हा जिल्ह्यातील पहिला उपक्रम कुडाळ शहरात राबविण्यात येणार आहे, असे श्री.शिरसाट यांनी यावेळी सांगितले.
शहरातील मच्छीमार्केट येथे सुसज्ज व अद्ययावत मच्छीमार्केट इमारत बांधण्यासाठी दोन कोटीचा निधीही न.पं.ला प्राप्त झाला होता. मात्र मच्छीमार्केटची जागा न.पं.च्या ताब्यात अद्याप मिळालेली नाही. त्या जागेच्या सातबारावर कुळ नोंद नाही, अशी जागा महाराष्ट्र शासनाने न.पं.च्या ताब्यात देण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक गेली दोन वर्षे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत आहोत. जेणेकरून शहरात सुसज्ज असे मच्छिमार्केट उभे राहील. परंतू ती जागा न.पं.कडे देण्यास प्रशासनाची मानसिकता नसल्याचे दिसते. यामागे कोणाचा राजकिय दबाव तर नाही ना? असा सवाल मंदार शिरसाट यांनी उपस्थित केला.
एमआयडीसी येथे घनकचरा निर्मूलन प्रकल्पासाठी न.पं.ने एमआयडीसीकडे जागेची मागणी केली आहे. याबाबतही गेले अनेक महिने पाठपुरावा सुरू आहे. स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. न.पं.ने जागेबाबत सात स्मरणपत्रही एमआयडीसी प्रशासनाला पाठवली आहेत. परंतू एमआयडीसी प्रशासनाकडून याबाबत दिरंगाई केली जात आहे. या प्रश्नांबाबत येत्या काळात महाविकास आघाडीचे नगरसेवक उपोषण छेडतील, प्रसंगी केसेस अंगावर घेण्याचीही आमची तयारी आहे. तसेच शहर विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. परंतू शहरात होणा-या विकासकामांचे श्रेय महाविकास आघाडीला जाईल, या भितीने विरोधकांकडून विकासाच्या प्रश्नांवर विनाकारण राजकारण केले जात आहे, असा आरोपही श्री.शिरसाट यांनी यावेळी केला.
न.पं.च्या सुसज्ज इमारतीसाठी शहरातील गावठी आठवडा बाजार भरतो, त्या जागेची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसा ठरावही करण्यात आला आहे. मात्र यातही विरोधकांकडून राजकारण केले जात आहे. यापुढील काळात सत्ताधाऱ्यांच्या सोबतीने विरोधकांनीही कुडाळ शहराच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करावे, असे उपनगराध्यक्ष किरण शिंदे म्हणाले.