
सावर्डे : शिक्षिका, लेखिका, कवियित्री, माता, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब, दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारं आयुष्य पणाला लावले. समाजातलं स्त्रीदास्यीत्व मिटविण्यासाठी स्त्रियांनी शिकून सावरून स्वावलंबी बनावं, म्हणजे त्यांना आपल्या खऱ्या शक्तीची ओळख होऊन पुरुषप्रधान समाजाची गुलामगिरी पत्करण्याची वेळ येणार नाही, असे ठाम मत त्यांनी स्त्रियांपुढे मांडलं. अज्ञान, जातीभेद, स्त्रीपुरुष भेदाभेद मिटविण्यासाठी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली व स्त्रीमुक्तीला सुरुवात झाली म्हणूनच सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत आहेत असे प्रतिपादन प्राचार्य राजेंद्र वारे यांनी केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शिक्षण हक्क दिन,बालिका दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन केले. कविता हळदीवे व वर्षा चव्हाण यांनी तयार केलेल्या सचित्र भित्तीपत्रकाचे उद्घाटन अपर्णा डीके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थी मनोगतात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती सांगितली व काव्यवाचन केले. कविता हळदीने व वर्षा चव्हाण यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.