
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील परमपूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगाव येथे कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती प्रेरणादायी वातावरणात पार पडली. या कार्यक्रमास संस्थेचे समन्वयक गौरी आडेलकर तसेच प्रतिनिधी ऋचा पेडणेकर उपस्थित होते.
कार्यक्रमात कोकण संस्थेचे समन्वयकसमीर शिर्के आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणासाठीच्या संघर्षमय जीवनप्रवासावर मार्गदर्शन केले. समाजातील रूढी, अंधश्रद्धा आणि विरोध यांना न जुमानता त्यांनी स्त्री शिक्षणासाठी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साथीत त्यांनी समाजाला दिलेला शिक्षणाचा वसा आज महिलांना मुख्य प्रवाहात आणणारा ठरला असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
मराठी विभाग प्रमुख स्वप्नाली सिंगनाथ यांनी त्या काळातील समाजात स्त्रियांची अवस्था अत्यंत मर्यादित होती, अशा परिस्थितीत शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना त्यांनी मनःपूर्वक प्रणाम केला. त्यांच्या कार्यामुळेच आज महिलांना उच्च शिक्षण व विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सचिन पाटकर होते. त्यांनी सावित्रीबाई फुले यांचे महिलांसाठीचे कार्य अजरामर असून असे नेतृत्व दुर्मीळ असल्याचे मत मांडले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. अंकिता नवार, सहाय्यक विभागप्रमुख प्रा. भक्ती चव्हाण, प्रा. समीक्षा परब, प्रा. रामदास पास्ते, प्रा. स्वप्नाली सिंगनाथ तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रा. अंकिता पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रामदास पास्ते यांनी केले. शेवटी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.










