सावंतवाडी : शिक्षक भारतीच्यावतीन दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार कवयित्री प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांना जाहीर झाला आहे. बालिका दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी येथे हा पुरस्कार वितरित केला जाणार असून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरणप्रसंगी प्रसिद्ध साहित्यिक प्रवीण बांदकर, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्याचे प्रमुख कार्यवाहक संजय वेतुरेकर, राज्य प्रतिनिधी सी डी. चव्हाण, शिक्षक भारती सिधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रशांत आडेलकर, कार्याध्यक्ष प्रदीप सावंत, सचिव समीर परब, संघटक आकाश पारकर, सर्व जिल्हाउपाध्यक्ष, महिला आघाडी प्रमुख सुष्मिता चव्हाण, महिला आघाडी सचिव प्रगती आडेलकर व इतर पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.
डॉ. शरयू आसोलकर यांनी ३३ वर्षे संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे ज्ञानदानाचे व्रत जोपासत मराठी विषयाचे अध्यापन केले. आज मराठी विभाग प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. प्रभावी अध्यापनातून महाविद्यालयीन युवकांच्या जाणिवा समृद्ध करताना स्वतःच्याही उत्कट भावना शब्दबद्ध करत त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे. तुटले पण पुन्हा बांधून घेताना हा कवितासंग्रह, ओळ अनमोल हे संपादन, विविध नियतकालिकांमधून केलेले समीक्षा लेखन, ललितलेखन, पुस्तक परीक्षणे या माध्यमातून साहित्य चळवळीमध्ये त्यांचा क्रियाशील सहभाग राहिला आहे. प्राध्यापिका म्हणून महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तसेच मुंबई विद्यापीठाच्या विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडतानाच मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, सिंधुदुर्ग साहित्य संघ, नवाक्षर दर्शन नियतकालिकाचे संपादक मंडळ अशा साहित्य विश्वामध्ये योगदान संस्थांच्या मोलाचे देणाऱ्या त्या क्रियाशील सदस्य आहेत.
मातृभाषा मराठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी आयोजित अनेक चर्चासत्रे, आकाशवाणी कार्यक्रम, काव्य मैफिली यामध्ये त्यांचा सातत्याने अभ्यासपूर्ण सहभाग राहिला आहे. त्यांच्या कवितांचा समावेश अभ्यासक्रमात करून मुंबई विद्यापीठाने त्यांचे साहित्यमूल्य अधोरेखित केले आहे. शिक्षक भारतीने त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि अभिमानास्पद कामगिरीची दाखल घेत त्यांची यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे शिक्षक भारती चे राज्याचे प्रमुख कार्यवाहक संजय वेतुरेकर यांनी स्पष्ट केले.