कोकणला 'अच्छे दिन' येणार !

Edited by: विनायक गावस
Published on: August 08, 2023 17:21 PM
views 400  views

सावंतवाडी : येणाऱ्या काळात कोकणाला चांगले रूप धारण होईल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणरेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण भूमिपूजन प्रसंगी केले. यामुळे कोकणवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 


भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाची पद्धत, धडाका, जे शक्य नाही ते करून दाखवण्याची जिद्द. यामुळे देशात त्यांच्या नावाचा बोलबाला आहे. अशाच कार्यपद्धतीमुळे अन् कामाच्या झपाट्यामुळं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची ओळख महाराष्ट्राचे नितीन गडकरी अशी झाली आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच विकासाच व्हिजन प्रत्यक्षात साकारताना रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोकण बदलतो आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण हा त्यातील एक टप्पा आहे. कोकणातील १९ स्थानकांना १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातील रेल्वे स्थानकं आंतरराष्ट्रीय विमानतळासारख रूप धारण करणार आहेत. यात सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्गनगरी, कणकवली या जिल्ह्यातील स्थानकांचा समावेश आहे. 

सिंधुदुर्गच्या विकासाचा नवा अध्याय हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लिहिला जात आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते याचा भव्य ऑनलाईन शुभारंभ झाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. रेल्वे स्थानकांनी टाकलेली कात पाहता कोकण रेल्वे प्रवाशांच्या सर्व मागण्या पूर्ण होतील असा विश्वास जनतेत निर्माण झाला आहे. 

गेली १२ वर्ष कोकणवासीयांची दुबती नस हा मुंबई-गोवा महामार्ग राहिला आहे. येथील भौगोलिक अडचणी, कोर्ट केसेस, भुसंपादन यामुळे हा प्रश्न पुर्णत्वास येत नव्हता‌. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात या सर्व प्रश्नांना पुर्णविराम मिळाला आहे. नुकतीच या महामार्गाची पहाणी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. ग्रीन एनर्जी टेक्नॉलॉजीद्वारे मुंबई-गोवा महामार्गाच काम गतिमानतेन होणार असून गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेन सुरु होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत तसा शब्दच मंत्रीमहोदयांनी दिला आहे. 

एवढंच नव्हे तर जिल्हा रूग्णालयातील एमआरआय मशीन, उप जिल्हा रूग्णालयांसाठी सिटीस्कॅन मशिन उपलब्ध करून देण्याच काम करत त्यांनी जिल्ह्याच पालकत्व निभावल. रस्ते, पुल, साकव यासह विकासकामांसाठी निधीची कमतरता कधी पडू दिली नाही. कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा सण असणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंत्री महोदयांनी स्वतः समोर टार्गेट ठेवलं आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचे जे शक्य झालं नाही, ते महाराष्ट्राचे नितीन गडकरी शक्य करून दाखवतील असा विश्वास जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.