को. रे. साठी होणाऱ्या आंदोलनाला के आर सी एम्पॉईज युनियनचा पाठिंबा !

उमेश गाळवणकर यांची माहिती
Edited by: देवयानी वरसकर
Published on: January 24, 2024 07:25 AM
views 189  views

कुडाळ : कोकण रेल्वेचे अस्तित्व अबाधीत ठेवून कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण हवे अशी मागणी कोकण रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी केंद्र व राज्य शासनाला केली आहे. याबाबत 26 जानेवारी रोजी होणा-या उपोषणास तसेच जनआंदोलनास के आर सी एम्पॉईज युनियनचा जाहीर पाठींबा आहे असे पत्रकात म्हटले आहे

         श्री  गाळवणकर यांनी म्हटले आहे की कोकण रेल्वे हे बॅ.नाथ पै यांचे स्वप्न होते. बॅ.नाथ पै यांच्या निधनानंतर प्रा.मधु दंडवते यांनी त्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला. साथी जॉर्ज फर्नांडीस आणि प्रा.मधु दंडवते यांच्या आग्रही भुमिकेमुळे कोकण रेल्वे अस्तित्वात आली हे वास्तव आहे. 2022-23 हे बॅ.नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष होते 2023-24 हे प्रा.मधु दंडवते यांचे जन्मशाताब्दी वर्ष आहे. आताच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शताब्दी वर्षाची सांगता अनेक ठिकाणी कार्यक्रम घेवून झाली. दुर्देव असे की एकीकडे प्रा.मधु दंडवते यांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे तर दुसरीकडे केंद्र शासन कोकण रेल्वेचे दोन भाग एक भाग मध्य रेल्वेकडे आणि एक भाग सर्दन   (दक्षिण-पश्चिम रेल्वे) रेल्वेकडे  करण्याच्या भूमिकेत आहे. कोकण रेल्वेच्या काही मागण्याकरीता 26 जानेवारी रोजी होणा-या उपोषणास तसेच जनआंदोलनास के आर सी एम्पॉईज युनियन चा जाहीर पाठींबा आहे. परंतू सदरील मागण्या कोकण रेल्वेच अस्तित्व अबाधीत राहील तरच सदरील मागण्या मान्य करुन घेण्यात यश येवू शकते कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलिनीकरण व्हावे ही सर्वांची इच्छा आहे. कोकण रेल्वे कर्मचा-यांची आहे आणि सामान्य कोकणी जनतेचीही आहे,लोकप्रतीनीधींची आहे. कारण पुढील काळात कोकण रेल्वे विकसीत करण्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद करण्यासाठी रेल्वे कॉर्पोरेशन अवलंबून राहून चालणार नाही; तर कोकण रेल्वे प्रकल्प भारतीय रेल्वेत विलीन होणे आवश्यक आहे. परंतु त्याचे दोन भाग करुन विलिनीकरणास कामगार संघटनांचा व कोकणी जनतेचा विरोध राहील.

त्यापेक्षा कोकण रेल्वे रोहा ते ठोक्कूर या 760 किलोमीटर कोकण रेल्वेच्या महामार्गाला स्वतंत्र झोनचा दर्जा देवून कोकण रेल्वे झोन तयार करावा आणि त्याचे विलिनीकरण भारतीय रेल्वेत कारावे असा निर्णय केंद्र शासनाने घेतल्यास सर्व दृष्टीकोनातून सोयीचे होईल. तरी महाराष्ट्र शासनास विनंती आहे की, केंद्राकडे शिफारस करताना कोकण रेल्वेचा 760 किलोमीटरचा स्वतंत्र झोनला मान्यता देवून भारतीय रेल्वेत विलिनीकरणाची शिफारस करावी. अशी विनंती कोकण रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी केंद्र व राज्य शासनाला केली आहे.