
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवासी आणि लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती दांडगी नसल्याने सुमारे १५ रेल्वे प्रवासी गाड्या धुळ उडवत जात आहेत. आज शुक्रवारपासून मडगाव ते चंदीगड अशी आणखी एक नवीन रेल्वे धावणार आहे. तीलाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबा नसल्याचे समोर आले आहे.
मडगाव ते चंदीगड अशी वन-वे स्पेशल ट्रेन शुक्रवार १२ जुलै पासून धावत आहे. रत्नागिरी, रोहा, पनवेल, वसई रोड मार्गे ही गाडी चंडीगडपर्यंत धावणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मडगाव जंक्शन ते चंदीगड ही वनवे स्पेशल ट्रेन (02449) १२ जुलै २०२४ रोजी सकाळी नऊ वाजता मडगाव जंक्शन येथून सुटली. ती चंदीगडला शनिवारी सायंकाळी सहा वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. या वनवे स्पेशलचे थांबे - करमळी, थिवी, पेडणे, रत्नागिरी, रोहा पनवेल, वसई रोड, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, हजरत निजामुद्दीन, नवी दिल्ली, पानिपत आणि अंबाला कॅन्ट असे आहेत. ही वनवे स्पेशल गाडी २२ डब्यांची एलएचबी श्रेणीतील धावणार आहे. यामध्ये वातानुकलीत श्रेणीसह स्लीपर व जनरल डब्यांचा ही समावेश आहे असे कोकण रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी म्हटले आहे.