कोकण रेल्वे प्रवासी संघटना व सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बचाव समिती होणार स्थापना

रविवारी बैठक | रखडलेल्या रेल्वे टर्मिनससाठी सावंतवाडीकर एकवटणार
Edited by:
Published on: November 24, 2023 16:36 PM
views 106  views

सावंतवाडी : सावंतवाडी रोड (मळगाव) रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी येत्या रविवार २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रीराम वाचन मंदिरमध्ये प्रवासी, नागरिक व व्यापाऱ्यांच्या उपस्थित चर्चा करून पुढील भूमिका ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण रेल्वे महामंडळाने सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे म्हणून आठ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत भूमिपूजन केले. पण, अजूनही रेल्वे टर्मिनस साकारले नसल्याने रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून सरकार, मंत्री, कोकण रेल्वे महामंडळ आदींचे लक्ष वेधले जात असतानाच प्रवासी आणि नागरीकांना एकत्रित करून प्रवासी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

सावंतवाडी रोड स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देण्यासाठी व नवीन रेल्वे गाड्यांना सावंतवाडी स्थानकात थांबा मिळण्यासाठी पुरेसे माध्यम असताना तसेच या स्थानकावरील अवलंबून प्रवासी वर्गाला, सावंतवाडीतील नागरिकांना, वेंगुर्ले व दोडामार्ग मधील नागरिकांना आणि कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विश्वासात न घेता कोकण रेल्वे प्रशासनाने वारंवार सावंतवाडी टर्मिनसवर जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे. किंबहुना करत आहे. सावंतवाडीवासियांनी एकदिलाने व एकजुटीने वेळीच एकत्र येऊन कोकण रेल्वे प्रशासनाविरोधात लढा दिला पाहिजे. अलीकडेच कोकण रेल्वेनं प्रवाशांसाठी लढणाऱ्या स्व. डि.के.सावंत यांचा अपमान केला आहे‌.

एकप्रकारे सावंतवाडीकरांची खिल्ली उडवण्यासारखा हा प्रकार आहे.या साठी सनदशीर तसेच कायदेशीर मार्गाने जाण्याची तयारी केली पाहिजे. या संदर्भात विचार विनिमय करून कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, व सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बचाव समिती स्थापन करण्यासाठी सावंतवाडी टर्मिनस प्रेमी व समर्थकांची सभा रविवार २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे आयोजित केली आहे.कोकण रेल्वे प्रवाशांच्यावतीने ॲड.संदीप निंबाळकर,अभिमन्यू लोंढे,मिहिर मठकर, भूषण बांदिवडेकर,सागर तळवडेकर व मित्र मंडळाने सर्व संबंधितांना उपस्थितीचे आवाहन केले आहे.