
सावंतवाडी : कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीची शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली कोकण रेल्वे सोबत बैठक पार पडली. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत प्रवासी संघटना सावंतवाडीची ही ऑनलाईन बैठक संपन्न झाली. यावेळी रेल्वे टर्मिनसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी इनायत हुसैन चीफ ऑपरेशनल मॅनेजर (कोचिंग) आणि त्यांची टीम उपस्थित होती. यावेळी मंत्री केसरकर यांनी लवकरच टर्मिनस बिल्डिंगच काम सुरू होईल असं सांगितलं. त्याचबरोबर सावंतवाडी टर्मिनस येथे पाणी पुरवठा करण्याचा मंत्री गुलाबराव पाटील यांचा समवेत सकारात्मक निर्णय बैठकीत झाल्याचे सांगितले. तसेच सावंतवाडी टर्मिनसच्या नामकरण संदर्भात चिपी विमानतळाच्या धर्तीवर हा विषय कॅबिनेटमध्ये घेऊ असेही ते म्हणाले.
यानंतर प्रवासी संघटनेतर्फे सचिव मिहिर मठकर यांनी सुरुवातीलाच सावंतवाडी स्थानकावर कोकण रेल्वे प्रशासन कसे जाणून बुजून दुर्लक्ष केले याचा पाढाच वाचला गेला. यानंतर संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी मंगलोर एक्स्प्रेस, वंदे भारत आणि नागपूर - मडगाव एक्स्प्रेसला सावंतवाडी स्थानकात थांबा मिळावा तसेच कोरोना काळात काढून घेण्यात आलेले थांबे पुन्हा पूर्ववत करावे या संदर्भात अभ्यासपूर्वक मांडणी केली. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. संपर्क प्रमुख भूषण बांदिवडेकर यांनी कोकण रेल्वे महामंडळावर आता ६००० कोटींचे कर्ज आहे. पुढे ते वाढत जाईल, त्यामुळे हे महामंडळ तत्काळ भारतीय रेल्वे कडे हस्तांतरित करावे अशी आग्रही मागणी केली. यावेळी कोकण रेल्वे कडून थांब्या संदर्भात सर्व अधिकार हे रेल्वे बोर्डाकडे आहेत असे सांगून हाथ झटकण्यात आले. यानंतर मंत्री केसरकर यांनी सावंतवाडी स्थानकात अधिकच्या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी ताबडतोब पावले उचलावीत असे आदेश कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले. सुमारे २५ मिनिटे चाललेली ही बैठक सावंतवाडी टर्मिनससाठी नक्कीच आशादायी ठरेल असे मत सचिव मिहिर मठकर यांनी व्यक्त केले.