LIVE UPDATES

कोकणची कन्या अमेरिकेतून डॉक्टरेट

Edited by:
Published on: July 09, 2025 17:19 PM
views 215  views

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कर्ला गावची सुकन्या, सुरभि दीपक अभ्यंकर, या इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन, इंडियानापोलिस, अमेरिका येथून ‘जैव रसायनशास्त्र आणि आण्विक जीवशास्त्र’ (PhD in Biochemistry and Molecular Biology) या विषयात डॉक्टरेट पदवी प्राप्त करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थिनी आहेत. ही बाब जिल्ह्यासाठी अत्यंत गौरवाची आणि अभिमानास्पद आहे.


१५ मे २०२५ रोजी इंडियाना युनिव्हर्सिटी इंडियानापोलिस येथे पार पडलेल्या मुख्य दीक्षांत समारंभात, फक्त पीएच.डी. विद्यार्थ्यांचीच नावे व्यासपीठावर जाहीर करण्यात आली. या वेळी सुरभिंना त्यांच्या संशोधन मार्गदर्शकाच्या हस्ते ‘डॉक्टोरल हूडिंग’ करण्यात आले. पीएच.डी. चा शालप्रकार (हूड) खास राजेशाही निळ्या रंगाचा असतो, "जो विद्येच्या उच्चतम स्तराचे प्रतीक मानला जातो." याच समारंभात युनिव्हर्सिटीच्या अध्यक्ष डॉ. पामेला व्हिटन (Dr. Pamela Whitten) यांनी डॉक्टरेट पदवी अधिकृतरीत्या जाहीर केली.


१६ मे रोजी इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या स्वतंत्र समारंभात, सुरभी यांना पुन्हा एकदा डॉक्टोरल हूडिंग देण्यात आले, तसेच स्कूल ऑफ मेडिसिनचे डीन यांच्या हस्ते पीएच.डी. पदवीचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे, या समारंभाच्या स्मरणिकेत त्यांच्या शैक्षणिक यशाची विशेष नोंद घेण्यात आली होती—त्यांचं नाव *Sigma Xi Grants-in-Aid of Research*, *Elite 50 Graduate Recognition*, आणि *Peter J. Roach Graduate Fellowship* या तीन वेगवेगळ्या राष्ट्रीय गौरवांकरिता प्रकाशित करण्यात आलं. या मान्यतांचा दुर्मीळ सन्मान मिळणं ही अतिशय प्रतिष्ठेची बाब मानली जाते.


सुरभिंची ही प्रेरणादायी वाटचाल म्हणजे चिकाटी, जिद्द, कुटुंबीयांचा आधार आणि विज्ञानावरील निष्ठा यांचं मूर्त उदाहरण ठरते. त्यांचा हा उल्लेखनीय प्रवास रत्नागिरी जिल्ह्यातील नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.