कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक | भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा मोठा विजय

ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या फेरीतच पहिल्या पसंतीची 20800 मतं
Edited by: भरत केसरकर
Published on: February 02, 2023 12:43 PM
views 399  views

बेलापूर : कोकण विभाग शिक्षक मतदार संघामध्ये भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुख्याध्यापक संघ व  अन्य संघटनाचे युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे तब्बल 11300 मतांनी विजयी झाले आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या फेरीतच पहिल्या पसंतीची 20800 मतं पडली असून बाळाराम पाटील यांना पहिल्या पसंतीची 9500 मतं पडली आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अपेक्षेपेक्षा  जास्त मत घेत हा दमदार विजय साजरा केला आहे. त्यामुळे तळ कोकणात महाविकास आघाडीला एक मोठा धक्का बसला आहे.


भाजपने तळ कोकणात महाविकास आघाडी ला धोबीपछाड दिला आहे. यामुळे शेकापला तळ कोकणात बसलेला हा मोठा धक्का मानायला हवा. पहिल्या फेरीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांना वीस हजार आठशे एवढी मत मिळाली आहेत. तर शेकापचे बाळाराम पाटील यांना 9500 मते मिळाली. आपण जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न आता मार्गी लावू, असा दावा विजयानंतर प्रतिक्रिया देताना ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केला आहे.


ज्या आमदाराने गेले सहा वर्षात काही केलं नाही आणि शिक्षक नसलेल्या आमदाराला मतदारांनी नाकारले आहे. आपण सर्वसामान्य शिक्षक असून शिक्षकांसाठी कायमस्वरूपी झटत राहू, अशी विजयानंतर प्रतिक्रिया ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली आहे. या विजयाने कोकणातले विजयाचे शिल्पकार रवींद्र चव्हाण हेच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रवींद्र चव्हाण यांची ही खेळी यशस्वी झालेली पाहायला मिळत आहे.