
कुडाळ : शहरातील मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले असताना, कुडाळ नगरपंचायतीचा कोंडवाडा मात्र रिकामाच आहे. पान बाजारातील नगरपंचायतीच्या इमारतीत असलेल्या या कोंडवाड्यात एकही जनावर कोंडलेले नाही. कोंडवाड्याची दुरवस्था असून तिथे ना जनावरे आहेत, ना त्यांच्यासाठी चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था.
मागील अनेक दिवसांपासून कुडाळ बाजारपेठेत मोकाट जनावरांचा सुळसुळाट सुरू आहे. यामुळे भाजी विक्रेत्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, रस्त्यांवर बिनधास्तपणे फिरणाऱ्या या जनावरांमुळे वाहनचालकांनाही अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे.
नगरपंचायतीकडे कोंडवाडा असूनही मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात ठेवण्याऐवजी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. नियमांनुसार, नगरपंचायतीने या जनावरांना कोंडून त्यांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र, कुडाळ नगरपंचायतीने अशी कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे सामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नगरपंचायतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोशाळांशी संपर्क साधून या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे अपेक्षित आहे. आता तरी नगरपंचायत या समस्येकडे लक्ष देईल का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सामान्य जनतेला या मोकाट जनावरांच्या त्रासातून कधी मुक्ती मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.










