कोलझर सरपंचांवर गैरव्यवहाराचा आरोप

ग्रामस्थांचं उपोषण
Edited by: लवू परब
Published on: July 01, 2025 19:45 PM
views 70  views

दोडामार्ग : कोलझर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सुजल सूर्यकांत गवस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत बेकायदेशीररीत्या दाखला देणे, नळपाणी योजनेचे साहित्य भंगारात विक्री करून आर्थिक गैरव्यवहार करणे, ग्रामपंचायतमध्ये शिपाई भरती बेकायदेशीर करणे आदी आरोप करत त्यांना अपात्र करण्यात यावे या मागणीसाठी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर कोलझर उपसरपंच, काही ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थांनी उपोषण छेडले आहे. 

सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यापूर्वी या संदर्भात उपसरपंच समिधा समीर गवस, ग्रा. पं. सदस्य विष्णू विश्राम नाईक तसेच प्रमिला प्रकाश देसाई, यांच्यासोबत चंद्रकांत नारायण देसाई, विष्णू शांताराम देसाई, संजय महादेव गवस, व समीर महादेव गवस यांनी निवेदन दिले होते. सुजल सूर्यकांत गवस व ग्रा. पं. मधील ग्रामसेविका या दोघीजणी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत आहेत. आपल्या सरपंच पदाचा गैरफायदा घेऊन कर्तव्यात कसूर करत आहेत. गावाच्या नळपाणी योजनेचे लोखंडी पाईप, इलेट्रिक पंप तसेच इतर साहित्य बेकायदेशीरपणे भंगारात विकून आर्थिक गैरव्यवहार केला आहे. सदर साहित्य विक्री बाबतची कोणतीही लिलाव प्रक्रिया न करता तसेच ग्रामपंचायत च्या मासिक बैठकीमध्ये चर्चा, ठराव न करता सरपंच गवस यांनी ही कृती केली आहे. एका परप्रांतीय व्यक्तीला ग्रा. पं. कडून सर्वे नं. ६ हिस्सा नं. १ ते १४ या मिळकती मध्ये कोणत्याही स्वरूपाची इमारत नाही. सदर क्षेत्र पूर्णपणे खुले आहे. असा दाखला लिहून दिला. व तो संबंधित परप्रांतीय व्यक्तीने खरेदी खत केलेल्या दस्तावेजाला जोडला असून सरपंच यांचे पती सूर्यकांत गवस हे दस्तऐवजला साक्षीदार आहेत असे या निवेदनात म्हटले आहे. शिवाय ग्रामपंचायत मध्ये बेकायदेशीर शिपाई भरती देखील करण्यात आली असून या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात यावी. तसेच सरपंचांना अपात्र ठरविण्यासंदर्भात आज ही उपोषण सुरू केले आहे. दरम्यान आज भाजपचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष दीपक गवस, माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, नगरध्यक्ष चेतन चव्हाण, शहराध्यक्ष राजेश फुलारी, जि. प. चे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, सुनील गवस, वैभव इनामदार यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन आपला पाठिंबा व्यक्त केला. 

उपोषणकर्त्यांचे नाहक आरोप : सरपंच सेजल गवस 

खरेदी खताला कोणीही साक्षीदार राहू शकतो. त्याला कोणतीही बंधने नसतात. हे उपोषणकर्त्याना बहुतेक माहिती नसावे. तसेच सदरची जमीन आमची नाही. माझे पती केवळ एक साक्षीदार म्हणून सदर परप्रांतीय व्यक्तीसाठी उपलब्ध राहिले. शिपाई भरतीसाठी एकूण सहा अर्ज दाखल झाले होते. प्रशासनाच्या अटी शर्तीप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करून जो अर्ज पात्र ठरला त्या अर्जाशी निगडित व्यक्तीची शिपाई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर नळपाणी योजनेशी निगडित साहित्याची भंगार साठीचा विक्री करण्याचा निर्णय हा ग्रामपंचायत मधील माझ्या कार्यकालापूर्वीच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ठरावाद्वारे निर्णय घेतला आहे. व त्याची कार्यवाही करण्याचे सर्वाधिकार सदर पदाधिकाऱ्यांनीच ग्रामसेवकांना दिले आहेत. व त्यानुसारच साहित्याची भंगार विक्री कार्यवाही झाली याची माहिती उपोषणकर्त्यांनी करून न घेता थेट उपोषण छेडले आहे. अशी प्रतिक्रिया कोलझर सरपंच यांनी दिली. 

मी माझ्या पदाचा कोणताही गैरवापर केलेला नाही. कायद्याच्या चौकटीत बसूनच दाखला दिला आहे. आणि राहिला विषय नोकर भरतीचा तर त्या सर्व अर्जाची छाननी करूनच छाननीतील अर्जदाराला प्राधान्य देऊन नोकरी भरती केली आहे. विरोधक फक्त नावाची बदनामी करण्यासाठी हे कटकारस्थान करत असल्याचे सरपंच सुजल गवस म्हणाल्या.