
सावंतवाडी : मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच जोरदार सरींनी सावंतवाडी शहराला झोडपून काढले असताना, वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. रात्री झालेल्या पावसात शहराचा वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले. या प्रकारामुळे ठाकरे सेनेचे युवा नेते आशिष सुभेदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मंगळवारी दुपारपासून सावंतवाडी आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला. या पहिल्याच पावसात शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्यास सुरुवात झाली. काही ठिकाणी तर अनेक तास वीज गायब होती, ज्यामुळे नागरिक त्रस्त झाले.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सुभेदार यांनी महावितरणच्या कारभारावर टीका केली आहे. "पहिल्याच पावसात जर अशी स्थिती असेल, तर ऐन पावसाळ्यात काय होईल, याची कल्पनाच केलेली बरी," असे ते म्हणाले. "महावितरणने पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली नाही, याचाच हा परिणाम आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची आश्वासने दिली जातात, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही," असे सुभेदार यांनी म्हटले.
दुसरीकडे वीजपुरवठा खंडित झाल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद पडली. अनेक लहान व्यावसायिकांनाही नुकसान सोसावे लागले. शहरातील व्यापारी वर्गाकडूनही यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सुभेदार यांनी महावितरणला तातडीने या समस्येकडे लक्ष देण्याची आणि भविष्यात असा प्रकार टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच, पावसाळ्यात अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे