सीईंओंना देणार घागर - नळाची भेट

मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे आक्रमक
Edited by: विनायक गांवस
Published on: May 08, 2025 13:33 PM
views 80  views

सावंतवाडी : तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे गावात जलजीवन योजनेअंतर्गत मंजूर असलेली कामे सद्यस्थितीत अर्धवट स्थितीत बंद पडली आहेत. यामुळे गावात पाणी टंचाई उद्भवत आहे. लाखो रुपये खर्च करून राबवत असलेली योजना आता धुळखात पडली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी खेबूडकर यांना लेखी निवेदन देऊन जलजीवन काम बंद असल्याने होणारी पाण्याची टंचाईबाबत कल्पना देऊनही अद्याप पर्यंत काम सुरू करण्यासंदर्भात कोणतेही ठोस कार्यवाही केलेली नाही.

हर घर जल हर घर नल असे ब्रीद वाक्य असलेली ही जलजीवन योजनेची मळेवाड गावातील स्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या या योजनेबाबत अधिकारी कसे उदासीन आहेत हे दिसून येत आहे. गावात मुबलक पाणी असताना पंपिंग मशिनरी व पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्याने ठेकेदार आणि अधिकारी यांच्या उदासनेतेमुळे गावात पाणीटंचाई उद्भवत असल्याने आपण 15 मे 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घागर आणि नळांची माळ भेट देऊन जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सहकाऱ्यांसमवेत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण छेडणार असल्याचे मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांनी सांगितले.