वाचन व्यक्तीमत्वास देते आकार : प्रा. एम. बी. बर्गे

Edited by: विनायक गांवस
Published on: January 02, 2025 20:36 PM
views 36  views

सावंतवाडी : वाचन ही निरंतर घडण्याची प्रक्रिया आहे. ती व्यक्तीमत्वास सर्वार्थाने आकार देत असते असे मत मराठी विभाग प्रमुख प्रा. एम. बी. बर्गे यांनी व्यक्त केले. श्री पंचम खेमराज महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमा अंतर्गत, वाचन कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

 यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रा. एम. बी. बर्गे यांनी कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना असे सांगितले की, वाचन ही निरंतर घडण्याची प्रक्रिया आहे. ती व्यक्तीमत्वास सर्वार्थाने आकार देत असते. लिहिणाऱ्याच्या हेतू नुसार वाचणाऱ्याच्या तयारी प्रमाणे होणारे अर्थांचे आकलन म्हणजेच वाचन होय. वाचनामुळे व्यक्तिमत्व विकास होऊन आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढते. दृष्टी, अक्षर ओळख, शब्द बोधवाचन, दिशा, अवाका, एकाग्रता, विचलन, आकलन, गती हे वाचन प्रक्रियेतील  महत्त्वाचे घटक आहेत. हे सर्व घटक वाचनात क्रियाशील असतात. चांगले आणि विपुल वाचनामुळे ज्ञानप्राप्ती होते. आणि माणूस बहुश्रुत होतो. यावेळी यावेळी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करताना प्रस्ताविका मध्ये डॉ.डी.जी. बोर्डे यांनी असे सांगितले की वाचनाने मनुष्य समृद्ध होतो व त्याचा सर्वांगीण विकास होतो करिता नवीन पिढीने वाचनाकडे आकर्षित झाले पाहिजे. स्वतःचा विकास केला पाहिजे.

यावेळी एफ.सी. विभाग प्रमुख प्रा.एम.ए.ठाकूर, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. व्ही. पी. राठोड व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन कु. सिद्धी बोंद्रे हिने तर आभार कु. पूजा कवडेकर हिने मानले.