
सावंतवाडी : नुकतेच रेल्वे बोर्डाने नवीन बांद्रा ते मडगाव अशी द्वी-साप्ताहिक गाडी जाहीर केली असून त्या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, सिंधुदुर्ग, आणि कणकवली या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.
ही गाडी सुरू व्हावी म्हणून कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीने अथक प्रयत्न केले होते. संघटनेने ही गाडी बोरिवली - वसई - सावंतवाडी अशी सुरू करावी या साठी प्रयत्न केले होते. परंतु सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनस हे अपूर्ण असल्याने त्यामुळे सध्या सावंतवाडी स्थानकात गाड्यांचे प्रायमरी मेंटेनन्स होत नसल्याने ही गाडी मडगाव पर्यंत धावणार आहे. कारण, कोकण रेल्वे मार्गावर फक्त मडगाव येथे प्रायमरी मेंटेनन्स होते. अशी सुविधा भविष्यात सावंतवाडी स्थानकात देखील उभी राहावी या साठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी प्रयत्नशील असून पाठपुरावा सुरू आहे.
नवीन सुरू झालेली गाडी ही कोकणासाठी नक्कीच गरजेची आहे. ही गाडी सावंतवाडी स्थानकात थांबवण्यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांचे आभार मानतो असे संघटनेचे सचिव मिहिर मठकर यांनी सांगितले.