तुमची छोटीशी खरेदी यांना देईल 'बळ'

Edited by: विनायक गांवस
Published on: October 29, 2024 14:47 PM
views 409  views

सावंतवाडी : समाजात वावरत असताना आपल्याला अनेकदा भगवंताने सगळं काही दिलं असतानाही केवळ लाचारी पत्करून अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने समाजाची मदत घेत असताना किंबहुना भिक मागतानाही दिसत दिसतात.  अशावेळी या धडधाकट लोकांच्या बुद्धीची निश्चितच किव आल्याशिवाय राहत नाही. मात्र समाजात काही व्यक्ती भगवंताने त्यांना शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या विकलांग केले तरी ते आपल्या 'दुर्दम्य इच्छाशक्ती' आणि 'साहस' यामुळे समाजात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करत असतात.

सावंतवाडी शहरातही अशीच अनेक साहसी व्यक्तिमत्व आहेत. सौ. रूपाली दीपक पाटील यांच्या संकल्पनेतून साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग संचलित दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र सावंतवाडीच्या माध्यमातून सतत दिव्यांगांना उभारी आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. येथे शिक्षण आणि प्रशिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी 'आम्हाला सहानुभूती किंवा मदत नको, मात्र आम्ही आमच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर निर्माण केलेल्या वस्तू फक्त खरेदी करा आणि दीप उजळू द्या.!' अशी साद समाजाला घातली आहे.

'दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल, तो ते लाहो.!', हे पसायदानातील ज्ञानदेवांनी सांगितलेले सार सिद्ध करण्यासाठी हे दिव्यांग बालकं 'साहस'च्या माध्यमातून चार पावलं पुढे सरसावली आहेत. त्यांनी तयार केलेल्या सुंदर आणि सुरेख अशा पणत्या अनेकांना आकर्षित करत असून त्यांच्याकडून पणत्या खरेदी करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने दीपोत्सव साजरा करावा, अशी विनंती प्रशिक्षण केंद्रांच्या समन्वयक सौ. विधिषा सावंत व साहस प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका सौ. रूपाली पाटील यांनी केले आहे.

येथे खरेदी कराव्यात पणत्या

सावंतवाडी शहरातील कारागृहाजवळ असणाऱ्या समाज मंदिराच्या गेटवर साहस प्रतिष्ठानच्या दिव्यांग बालकांनी तयार केलेल्या आकर्षक पणत्यांचा स्टॉल लावलेला आहे. तरी ज्या बांधवांना आकर्षक पणत्या खरेदी करायचे आहेत, त्यांनी तेथे येऊन खरेदी कराव्यात, असे आवाहन संचालिका रूपाली पाटील यांनी केले आहे. संस्थेच्या कार्याविषयी आणि इतर मदतीसाठी व अधिक माहितीसाठी विधिशा सावंत (मोबाईल क्रमांक 9420252451) व रूपाली पाटील (मोबाईल क्रमांक 9623883765) या क्रमांकावर माहिती घ्यावी, असे आवाहन केले आहे.