गुहागरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन

राजेश बेंडल यांनी भरला उमेदवारी अर्ज
Edited by: मनोज पवार
Published on: October 29, 2024 08:27 AM
views 305  views

चिपळूण : गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार म्हणून स्व. रामभाऊ बेंडल यांचे सुपुत्र राजेश बेंडल यांनी  शिवसेना शिंदे गट या पक्षातून जोरदार शक्तीप्रदर्शन करीत  सोमवार २८ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी  महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते  आणि मोठ्या संख्येने कुणबी समाज बांधव उपस्थित होते. 

सकाळी  १० वाजता गुहागर बाजार शृंगारतली  येथे पदाधिकरी आणि  कार्यकर्ते जमा झाले. नंतर  तिथून गाड्यांचा सर्व ताफा हळूहळू गुहागरच्या दिशेने निघाला. गुहागर शिवाजी चौक येथे गेल्यानंतर लोकांची गर्दी वाढू लागली.  रस्त्याच्या दोन्ही बाजूला भगवे फेटे आणि गळ्यात धनुष्यबाण निशाणी असलेले पक्षाचा शेला घालून कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. 

यावेळी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला उमेदवार राजेश बेंडल यांनी पुष्पा अर्पण केला आणि एकच जल्लोष झाला. सर्वांनी घोषणा  देत रॅलीचा जोश वाढवला. रॅलीमध्ये महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणत होता. घोषणा देत सर्व कार्यकर्ते एका बाजूने डेपोच्या दिशेने जात होते. या रॅलीत स्वतः पालकमंत्री उदय सामंत होते.  डेपो येथे गेल्यानंतर आलेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री ना. उदय सामंत, जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि उमेदवार राजेश बेंडल यांनी संबोधित केले.  या ठिकाणी रॅली थांबवून ठराविक कार्यकर्ते अर्ज दाखल करण्यासाठी गुहागर  तहसीलदार कार्यालय  येथे गेले. 

त्यानंतर महायुतीचे पदाधिकारी यांनी राजेश बेंडल यांचा उमेदवारी अर्ज तहसीलदार यांना दाखल केला.  कुणबी समाजातील  राजेश बेंडल यांना उमेदवारी शिवसेनेने दिल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला असून या वेळेला काही करू पण गुहागर विधान सभेतून राजेश बेंडल यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.   जीवाचे रान करून आलेली संधी न गमावता एक दिलाने आणि  एक मताने काम करू असा विश्वास सुद्धा यावेळी सगळ्यांनी व्यक्त केला.

यावेळी पालकमंत्री ना. उदय सामंत, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सेना तालुकाध्यक्ष दीपक कनगुटकर, यशवंत बाईत, शिवसेना पदाधिकारी, त्यानंतर समाजाचे  रामचंद्र हुमने, तुकाराम निवाते, कुणबी संघाचे सरचिटणीस कृष्णा वने, आणि खेड, चिपळूण आणि गुहागर कुणबी संघ शाखा पदाधिकारी आणि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.