
दापोलीः दापोली शहर व तालुक्याचा विकास हा केवळ संजयराव कदम हेच करू शकतात. त्यामुळेच आम्ही सर्व नगरसेवक येत्या 28 ऑक्टोबर रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये जाहीर पक्ष प्रवेश करत असल्याची माहिती राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे नगरसेवक खालीद रखांगे यांनी दिली.
महाराष्ट्रामध्ये बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये अत्यंत धीराने व सर्व समाजाला सोबत घेऊन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वाटचाल करत असल्याचे पाहून आम्हाला या पक्षामध्ये त्यांचा एक सैनिक म्हणून काम करण्याची इच्छा झाली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आठ पैकी सात नगरसेवक वेगळा गट करून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करत आहोत असे खालीद रखांगे यांनी सांगितले.
दापोली शहराचा विकास त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये विकासाची गंगा ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून संजयराव कदम हे आणू शकतात. गेली काही वर्षे जाणूनबुजून शहर विकासाच्या बाबतीत राजकारण सुरू असून दापोली शहराला पुर्णवेळ मुख्याधिकारी दिला गेला नाही. अनेक विकासकामांचा निधी व प्रस्ताव अडवून ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तालुक्यात अनेक विकासकामे प्रलंबित ठेवली आहेत. ही सर्व कामे संजयराव कदम हेच करू शकतात असा जनतेचा ठाम निश्चय व निर्धार आहे. त्यामुळे जनतेचे मत घेऊन आम्ही हा पक्षप्रवेश करत आहोत. संपूर्ण शहरामध्ये आम्ही संजयराव कदम यांच्यासाठी प्रचार करणार असून येत्या 28 ऑक्टोबर रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 7 नगरसेवक, राष्ट्रवादी पक्षाचे अनेक पदाधिकारी, आजी माजी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, व अनेक कार्यकर्ते अन्य पक्षाचे पदाधिकारी असा जम्बो पक्षप्रवेश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नगरसेवक मेहबूब तळघरकर, अश्विनी लांजेकर, रिया सावंत, संतोष कळळकुटके, अन्वर रखांगे, नगराध्यक्ष ममता मोरे, अजिम चिपळूणकर, सौ. गिलगिले, उबाठा तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, शहरप्रमुख संदीप चव्हाण व अन्य मान्यवर उपस्थित होते.