'घुंगुरकाठी'च्या 'दळवी कट्ट्या'वर जयवंत दळवींच्या आठवणींचा जागर

Edited by: संदीप देसाई
Published on: October 22, 2024 12:13 PM
views 38  views

सिंधुदुर्ग :  जयवंत दळवींच्या आठवणी, चित्रफिती, अभिवाचन, साहित्यावर चर्चा अशा उपक्रमांनी आडाळी (ता. दोडामार्ग) येथील 'घुंगुरकाठी' संस्थेने आयोजित केलेल्या 'दळवी कट्ट्या'वर जयवंत दळवींच्या आठवणींचा जागर पार पडला. निमित्त होते ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीचे. दळवींचे पुतणे पुरुषोत्तम उर्फ सचिन दळवी, स्नुषा उर्मी दळवी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आरवली (शिरोडा) येथील ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात यावर्षी १४ ऑगस्टला झाली. यानिमित्ताने काही तरी कार्यक्रम करावा, अशी कल्पना सुचल्यानंतर 'घुंगुरकाठी'चे अध्यक्ष सतीश लळीत व उपाध्यक्ष डॉ. सई लळीत यांनी 'दळवी कट्ट्या'च्या रुपाने प्रत्यक्षात आणली. जिल्ह्यातील निवडक साहित्य रसिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

सुरुवातीला श्री. सतीश लळीत यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची संकल्पना सांगितली. श्री. सचिन दळवी यांच्याहस्ते दळवींच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. सचिन दळवी यांचा सत्कार शाल, श्रीफळ देऊन श्री. लळीत यांनी केला. डॉ. सई लळीत यांच्याहस्ते उर्मी दळवी यांचा 'चित्रकथी' शैलीतील गणपती, रिद्धी सिद्धीचं चित्र देऊन सत्कार करण्यात आला. विश्वकोश मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी यांचाही सत्कार शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला.

श्री. दळवी यांनी 'सुमारे सव्वा तास 'जयाकाकांच्या आठवणी' सांगून रसिकांना खिळवून टाकले. याबरोबरच दळवींच्या अनेक पुस्तकांतील प्रकरणांचे अभिवाचन, दळवींबद्दल पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या भाषणांच्या चित्रफिती, दळवींच्या साहित्यावर आणि एकंदर साहित्य व्यवहारावर मुक्त चर्चा असे कार्यक्रमाचे अनौपचारिक स्वरुप होते. उद्घाटन, अध्यक्ष, सूत्रसंचालक या सगळ्या उपचारांना फाटा देण्यात आला. असा मोकळाढाकळा कार्यक्रम दिवसभर मस्तपैकी रंगला. कार्यक्रमाच्या या स्वरुपामुळे प्रत्येकाला सहभागी होता आले.

सतीश लळीत यांनी 'अलाणे फलाणे'मधील एक प्रकरण सादर केले. डॉ. सई यांनी 'सारे प्रवासी घडीचे' मधील शांतू न्हावी सादर केला. पी. एल. कदम यांनी दळवीनी नाट्यचळवळीबद्दल एका लेखात मांडलेले विचार वाचून दाखवले. मधुभाईंच्या भाषणाची ४० मिनिटांची आणि श्री. प्रभावळकरांच्या भाषणाची १५ मिनिटांची चित्रफीत प्रोजेक्टरवर दाखविण्यात आली. नंतर सुमारे दीड तास दळवींच्या साहित्यावर मुक्त चर्चा झाली.

कार्यक्रम संपल्यानंतर जवळच्याच मोरगाव येथील माऊली मंदिर आणि म्हाताराबाबा या लोकदैवताच्या ठिकाणाला सर्वांनी भेट दिली. अत्यंत निसर्गरम्य, शांत, रमणीय ठिकाणच्या या छोट्याशा सहलीने कार्यक्रमाची सांगता झाली. 'घुंगुरकाठी'च्या 'दळवी कट्ट्या'वर अशाप्रकारे दळवींच्या आठवणींचा गजर आणि जागर दिवसभर झाला.

 उपस्थित रसिकांनी आपापला सुरेख सहभाग नोंदवला. सचिन दळवी, उर्मी वहिनी, ॲड. देवदत्त परुळेकर, सौ. मंगलताई परुळेकर, प्रा. विजय फातर्पेकर सर, श्रीमती पद्मा फातर्पेकर, ॲड. नकुल पार्सेकर, लेखिका वृंदा कांबळी, पुरुषोत्तम लाडु कदम, विनय सौदागर, अभिनेते श्याम नाडकर्णी, नीतिन वाळके, आडाळीचे सरपंच पराग गावकर, श्री. पित्रे आदिंनी सहभाग नोंदवला. दळवींसोबत घालवलेला एक दिवस आणि 'दळवी कट्ट्या'वर मारलेल्या गजाली बराच काळ स्मरणात राहतील, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.