सिंधुदुर्ग : कवयित्री डॉ. सई लळीत यांच्या मालवणी कवितांवर आधारित नाट्याविष्काराचा 'घुंगुरकाठी' निर्मित 'भावबंध कोकणचे' हा कार्यक्रम उद्या शुक्रवारी 22 रोजी पणजी, गोवा येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाच्या अद्ययावत प्रेक्षागृहात सायंकाळी 5 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमात सादर होणाऱ्या कविता, संहितालेखन, निवेदन आणि दिग्दर्शन डॉ. सई लळीत यांचे आहे. या कार्यक्रमात तेरा कलाकारांचा सहभाग आहे. निवेदनानंतर कलाकार कविता सादर करताना रंगमंचावर त्या कवितेचा नाट्याविष्कारही सादर होतो. या कार्यक्रमाचे प्रयोग आतापर्यंत कणकवली, प्रभादेवी, ठाणे, मुलुंड वगैरे ठिकाणी झाले असून त्यांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिव्हाळ्याचे विशेष नाते आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी मालवणी बोली उत्तर गोव्याच्या ब-याच भागात बोलली जाते. त्यामुळे मालवणी बोलीतील निवेदन आणि कविता यांच्या माध्यमातून गोवा-कोकणचा अनोखा भावबंध या कार्यक्रमामुळे अधोरेखित होणार आहे.
या कार्यक्रमात निलेश पवार, सुप्रिया प्रभुमिराशी, मंगल राणे, डॉ. संदीप नाटेकर, राकेश काणेकर, श्रेयश शिंदे, सत्यवान गावकर, सिद्धी वरवडेकर, विशाल गुरव, प्रमोद कोयंडे, तृप्ती भोगले, श्रद्धा परब आणि दशावतारी कलावंत नारायण आईर या तेरा कलाकारांचा सहभाग आहे. कार्यक्रमाची निर्मिती 'घुंगुरकाठी'चे सतीश लळीत यांची आहे.
गोव्यातील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा या प्रतिष्ठित संस्थेने १८ ते २५ नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय पुस्तक सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यानिमित्ताने रोज सायंकाळी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही केले आहे. त्यात हा कार्यक्रम होत आहे. रसिकांसाठी खुला असलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब, सदस्य सचिव अशोक परब, सादरकर्त्या डॉ. सई लळीत यांनी केले आहे.