ओसरगाव टोल सुरू होण्याच्या मार्गावर ; निविदा प्रक्रिया जाहीर

टोलविरोधी पुन्हा लढा उभा राहणार का? मे पासून वसुलीची शक्यता?
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 22, 2026 10:35 AM
views 382  views

कणकवली : मुंबई–गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अंतिम टप्प्यात पोहोचत असताना सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाक्यावरून मे महिन्यापासून पथकर वसुली सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या वतीने टोल वसुलीसाठी ऑनलाईन निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. येत्या २४ एप्रिल रोजी निविदा उघडण्यात येणार असून त्याच दिवशी ठेकेदार निश्चित केला जाणार आहे. सरकारला दरवर्षी ५७.८८ कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

यापूर्वी ओसरगाव टोल नाक्यावर तीन वेगवेगळ्या एजन्सींची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, टोल वसुली सुरू होताच टोलविरोधी कृती समिती तसेच विविध राजकीय पक्षांनी जोरदार आंदोलन छेडले होते. परिणामी, १४ जून २०२३ रोजी सुरू झालेली टोल वसुली आंदोलनाच्या दबावामुळे बंद करण्यात आली होती. त्यानंतर गेली तीन वर्षे या टोल नाक्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नव्हती.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १७ एप्रिल रोजी ऑनलाईन निविदा प्रसिद्ध करून पुन्हा एकदा टोल वसुलीचा मार्ग मोकळा केला आहे. जानवली पूल ते पत्रादेवी या सुमारे ६० किलोमीटर मार्गासाठी दुचाकी आणि तीन आसनी वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व वाहनांवर टोल आकारण्यासाठी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत २३ एप्रिल असून, २४ एप्रिल रोजी नवी दिल्ली येथील कार्यालयात निविदा उघडल्या जाणार आहेत.

निविदा नोटिशीनुसार, या मार्गावर सर्वाधिक वाहतूक कार, जीप आणि व्हॅन (४९ टक्के) या हलक्या वाहनांची आहे. त्यानंतर बस आणि दोन ॲक्‍सल ट्रक (२७ टक्के), तर मल्टी ॲक्‍सल वाहनांचे प्रमाण १९ टक्के आहे.

महामार्ग विभागाने मुंबई–गोवा महामार्गाचे चौपदरीकरण मे २०२६ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्याचबरोबर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून महामार्गावरील सर्व टोल नाके सुरू करण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाका सर्वप्रथम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, जाहीर करण्यात आलेल्या निविदांमध्ये स्थानिक वाहनांना टोलमधून सूट देण्याबाबत कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परिणामी, टोलविरोधी आंदोलन पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.


अशी होणार टोल वसुली

*कार, जीप, व्हॅन :*

वन वे – ₹१२५

जाणे-येणे – ₹१९०

मासिक पास – ₹४१७०

सिंधुदुर्ग नोंदणी – ₹६५


मिनीबस व हलकी व्यावसायिक वाहने :

वन वे – ₹२००

जाणे-येणे – ₹३०५

मासिक पास – ₹६७४०

सिंधुदुर्ग नोंदणी – ₹१००


दोन ॲक्‍सल बस व ट्रक :

वन वे – ₹४२५

जाणे-येणे – ₹६३५

मासिक पास – ₹१४१२०

सिंधुदुर्ग नोंदणी – ₹२१०


व्यावसायिक वाहने :

वन वे – ₹४६०

जाणे-येणे – ₹६९५

मासिक पास – ₹१५४०५

सिंधुदुर्ग नोंदणी – ₹२३०


अवजड वाहने :

वन वे – ₹६६५

जाणे-येणे – ₹९९५

मासिक पास – ₹२२१४५

सिंधुदुर्ग नोंदणी – ₹३३०

ही संपूर्ण घडामोड लक्षात घेता, ओसरगाव टोल नाक्याच्या पुनरुज्जीवनामुळे स्थानिक स्तरावर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.