
सावंतवाडी : ईश्वर हा सर्वांचा सारखाच असतो. भगवान येशू जसे तुमचे तसे ते माझेही देवच आहेत, अशी आमची भावना आहे. आज मिलाग्रीस प्रशालेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना संस्कार आणि शिक्षण दिले जात असल्याचा सार्थ अभिमान आहे. मिलाग्रीस चर्चचे काम प्रगतीपथावर असून यासाठी जे काही सहकार्य लागेल ते नक्की केले जाईल. तसेच या प्रशालेचे मुख्याध्यापक व संपूर्ण शिक्षकांना योग्य ती मदत आमच्याकडून नक्कीच करू, असे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडीनगरीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी येथे केले.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मिलाग्रीस प्रशालेत श्री. परब यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी श्री. परब बोलत होते. यावेळी व्यासपीठावर फादर मिलेट डिसोजा, प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, ॲड. कु. वैष्णवी परब यांसह अन्य उपस्थित होते.दरम्यान यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीची चेतना जागृत करणारे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा म्हणाले, स्वातंत्र्यदिन केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता आपली कर्तव्य आणि जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडून स्वातंत्र्याची खरी महती जगायला हवी. प्रशालेच्या माध्यमातून आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रती स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत.
यावेळी मिलाग्रीस प्रशालेने सावंतवाडी शहरातून तब्बल 100 फूट लांब तिरंगा ध्वजासह भव्य दिव्य अशी 'तिरंगा रॅली' आयोजित केली. या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे सावंतवाडी शहरात पहिल्यांदाच एवढा भला मोठा तिरंगा ध्वज लोकांना अनुभवता आला. प्रशालेच्या या स्तुत्य उपक्रमाचे समाज माध्यमातून विशेष कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका अनिता सडवेलकर यांनी केले.