
सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष, पत्रकार अमोल टेंमकर यांचे वडील मंगेश अंकुश टेंमकर यांचे काल, शुक्रवार, २३ मे रोजी रात्री ८ वाजता न्यु सालईवाडा, मोरडोंगरी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज, शनिवार, २४ मे रोजी सकाळी १०.३० वाजता उपरलकर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मंगेश टेंमकर यांच्या पश्चात तीन मुलगे आणि दोन मुली असा परिवार आहे. पत्रकार अमोल टेंमकर, प्रसाद टेंमकर आणि गॅरेज व्यावसायिक सुरज टेंमकर यांचे ते वडील होत.
सालईवाडा आयटीआय परिसरात त्यांचे 'श्री समर्थ सायकल स्टोअर्स' नावाचे गॅरेज होते. जिथे ते सायकल दुरुस्ती आणि भाड्याने देण्याचा व्यवसाय करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने टेंमकर कुटुंबावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.