
मंडणगड : शंभर दिवसाचे कृती आराखडा कार्यक्रमाचे अंतर्गत 19 मार्च 2025 चे राज्यशासनाचे महसुल विभागाचे शासन निर्णयान्वये तहसिलदार अक्षय ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडणगड तालुक्यात 1 एप्रिल 2025 पासून जीवंत सातबारा मोहीमेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. यात 1 ते 5 एप्रिल 2025 या पाच दिवसाचे कालावधीत तालुक्यात ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) यांच्या माध्यमातून त्यांच्या सजेमध्ये येणाऱ्या गावामध्ये चावडीवाचन उपक्रम राबविण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे.
यात न्यायप्रविष्ठ प्रकरणे सोडून गाव निहाय मयत खातेदार यांची यादी तयार कऱण्यास सुरुवात झाली आहे. 6 ते 20 एप्रिल 2025 या नमुद दिवसांचे कालावधीत वारस तपास मोहीम राबवण्यात येणार आहे. यात वारस तपासकरिता आवश्यक असणाऱ्या विहीत नमुन्यातील परिपुर्ण कागदपत्रांसहीत आलेल्या प्रस्तावांचे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या माध्यमातून स्थानीक चौकशी पुर्ण करुन वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजुर करण्यात येणार आहेत. 21 एप्रिल ते 10 मे 2025 या नमुद तारखांचे कालावधीत तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करणे म.ज.म.अ. 1966 च्या विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफार वर निर्णय घेऊन त्यानुसार सातबार दुरुस्त करणार आहेत. त्यानुसार सर्व जिवंत व्यक्ती यांची सातबारावर नोंद केली जाणार आहे. वरील मोहीमेत वारस नोंदीकरीता ई हक्क प्रणालीमार्फत अर्ज नोंदविण्यात येणार आहे.
सातबारावरील एकत्र कुटुंब प्रमुख्याच्या नोंदी मध्ये खातेदरांच्या सर्व वारसांची नावे उपविभागीय अधिकारी दापोली यांचे 26 मार्च 2025 चे परिपत्रकान्वये दाखल करण्यात येणार आहेत. तालुकावासीयांनी महसुल विभागाने सुरु केलेल्या या विशेष मोहीमेचा लाभ घेऊन आपला सातबारा अद्ययावत करुन घ्यावा याचबरोबर प्रस्तावांचे कागदपत्रासंदर्भातील अधिक माहीतीसाठी तलाठी सजांमध्ये अथा तहसिल कार्यालय मंडणगड येथे संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार अक्षय ढाकणे यांनी केले आहे. या मोहीमेसाठी तहसिल कार्यालयातील तलाठी मंडळ अधिकारी व सर्व कर्मचारी मेहनत घेत आहेत.