श्रीराम वाचन मंदिरात मराठी भाषा गौरव दिन

Edited by: विनायक गांवस
Published on: February 27, 2025 20:20 PM
views 140  views

सावंतवाडी : श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे मराठी भाषा दिन अर्थात कवी कुसुमाग्रज तथा लेखक, नाटककार, कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ दिनांक २७ फेब्रुवारी या दिवशी वाचन अभिरुची वृद्धिंगत करण्यासाठी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. यावर्षी मराठी भाषेस अभिजात दर्जा प्राप्त झाल्याने या दिनास विशेष महत्व प्राप्त झाले आहे. 

याच बरोबर दिल्ली येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजनामुळे या वर्षी या उपक्रमास विशेष प्रसिद्धी प्राप्त झाली. श्रीराम वाचन मंदिरात या पार्श्वभूमीवर कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंती दिनी मराठी भाषा समारंभ आयोजित करण्यात आला. याप्रसंगी संस्था कार्यवाह रमेश बोंद्रे, उपकार्याध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा, ग्रंथालय कर्मचारी महेंद्र पटेल, सौ. रंजना कानसे, महेंद्र सावंत  गुरुप्रसाद वाडकर, वाचक आणि सभासद उपस्थित होते.

या प्रसंगी श्री. बोंद्रे यांनी मराठी भाषा शिक्षणातून जोपासली गेली पाहिजे तर डॉ. जी. ए. बुवा यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा म्हणून रुजली पाहिजे तरच मराठी भाषा सर्वदूर व्यवहारातही प्रसारित होऊन तिचा अभिजात दर्जा अधिक संपन्न होण्यास मदत होईल हे स्पस्ट केले.यावेळी वाचनालयातील कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचे साहित्य तसेच नवीन खरेदी केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच कुसुमाग्रज याच्या प्रतिमेस पुष्पहार घालून स्मरण करण्यात आले. समारंभाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांचे आभार ग्रंथपाल महेंद्र पटेल यांनी आभार मानले.