
देवगड : मराठी विश्वातील थोर साहित्यिक आदरणीय वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील विद्यार्थ्यानी ग्रंथ दिंडी काढली. गोगटे प्रशाला ते जामसंडे परिसर या भागात ढोल, ताशा यांच्या गजरात व विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत अगदी उत्साहपूर्ण वातावरणात ग्रंथ दिंडी काढण्यात आली. ग्रंथ दिंडी मध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव, मराठी विषय शिक्षक मंगेश गिरकर, पराग हिरनाईक, समीर राऊत, प्रज्ञा चव्हाण, राधिका वालकर, दीपा टकले, मोहन सनगाळे, विनायक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक सुनील जाधव यांच्या शुभहस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्रशालेतील मुलींच्या काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते नववी मधील ११ मुलींनी प्रतिथयश मान्यवर कवींच्या कविता सादर करून काव्यवाचन कार्यक्रमाची उंची गाठली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मंगेश गिरकर यांनी तर काव्यवाचन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सांची तांबे हिने केले.