तिलारी घाटातील खचलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी

Edited by: लवू परब
Published on: February 22, 2025 20:28 PM
views 48  views

दोडामार्ग : तिलारी घाटातील जयकर पॉईंट येथे खचलेल्या रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाची पाहणी स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई यांसह स्थानिकांनी केली. यांच्या महाशिवरात्री निमित्त मेढे येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी काम लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी चंदगड बांधकाम उपविभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्याकडे उपस्थितांनी केली.

तिलारी घाटातील जयकर पॉईंट येथे अतिवृष्टीमुळे रस्त्याचा काही भाग खचला होता. शिवाय २० जूनपासून तिलारी घाट एसटी बससाठी बंद केल्याने सर्वसामान्यांचे प्रचंड हाल झाले. घाटातून एसटी पुन्हा सुरू व्हावी यासाठी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई, कोदाळी माजी सरपंच अंकुश गावडे व स्थानिक ग्रामस्थांनी विविध आंदोलने, उपोषणे केली. मात्र प्रशासन चालढकलपणा करू लागला.

स्थानिकांचा प्रशासनाविरोधात वाढता उद्रेक पाहता एसटी पुन्हा सुरू करणे महत्त्वाचे बनले. त्यामुळे प्रशासनाने घाटातून एसटी उतरवून प्रात्यक्षिकही घेतले. यावेळी खचलेल्या रस्त्याचे सबब एसटी महामंडळाने पुढे केले. त्यामुळे खचलेल्या रस्त्याचे काम करणे महत्त्वाचे बनले. प्रवीण गवस, दत्ताराम देसाई, अंकुश गावडे व इतर स्थानिकांनी पुढाकार घेत खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी चंदगड बांधकाम उपविभागाला अल्टिमेटम दिला. स्थानिकांच्या संतप्त भावना लक्षात घेता चंदगड बांधकाम उपविभागाने खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवून त्यास मंजुरी प्राप्त करून घेतली. खचलेल्या रस्त्याची दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. काम करण्यात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी हा घाट सर्व वाहनांना वाहतुकीस बंद करण्यात आला. मात्र काही पराक्रमी चालकांनी घाटातून वाहने सुरूच ठेवली.

वाहनांमुळे काम करण्यास अडचण निर्माण होऊ लागली. शिवाय महाशिवरात्री निमित्त घाटमाथ्यावरील अनेक भाविक मेढे येथे श्री नागनाथाच्या दर्शनाला येतात. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रवीण गवस, दत्ताराम देसाई,सचिन देसाई व स्थानिकांनी कामाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. काम नियोजनबद्ध व सुस्थितीत होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना घाटातून ये-जा करण्यास कोणताही त्रास होऊ नये यासाठी काम लवकर पूर्ण करावे अशी‌ मागणी उपस्थितांनी बांधकाम उपविभाग व संबंधित ठेकेदाराकडे केली.

फुकाचे श्रेय लाटू नये 

तिलारी घाटातून एसटी सुरू व्हावी यासाठी आम्ही स्थानिकांनी अनेक प्रयत्न केले. यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले. या उपोषणात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी भाग घेत मोलाचे सहकार्य दिले. याचे फलित म्हणून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. मात्र काही जण येथे येऊन फुकाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी फुकाचे श्रेय न घेता एसटी सुरू होण्यासाठी आमच्या सोबत यावे व श्रेय घ्यावे, असे स्वराज्य सरपंच सेवा संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी स्पष्ट केले.