मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा

Edited by: विनायक गांवस
Published on: February 18, 2025 20:08 PM
views 96  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि विद्या विकास मंडळ, इन्सुली यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हे ठरविण्यात आले.पत्रकार तथा नाट्यकर्मी कै.प्रवीण मांजरेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  

ही स्पर्धा गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालय या ठिकाणी होणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून स्पर्धेनंतर तात्काळ पारितोषिक वितरण केले जाणार आहे. पत्रकार संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबैठकीस सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सहसचिव विनायक गांवस ,उपाध्यक्ष हेमंत मराठे, सदस्य तथा स्पर्धा नियोजन प्रमुख गुरुनाथ पेडणेकर, माजी अध्यक्ष राजेश मोंडकर, सचिन रेडकर, हर्षवर्धन धारणकर, दिव्या वायंगणकर, नागेश पाटील आदी उपस्थित होते. सावंतवाडी तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये दोन गट सहभागी होणार असून पहिल्या गटामध्ये पाचवी ते आठवी या विद्यार्थ्यांची वकृत्व स्पर्धा होणार आहे. यामध्ये 'पुस्तक माझा खरा मित्र' आणि 'मोबाईल मुळे बालपण हरवत आहे का?' हे दोन विषय देण्यात आले असून चार मिनिटे वेळ देण्यात आला आहे. या गटामध्ये प्रथम क्रमांकाला ११११ रुपये रोख प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह पारितोषिक दिले जाणार आहे तर उपविजेत्याला 777 रोख रक्कम,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला 555 रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.


दुसऱ्या गटामध्ये नववी ते बारावीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या गटासाठी 'मराठी राजभाषेसमोरील आव्हाने' आणि 'मराठी भाषा विकासात माझी भूमिका' हे विषय देण्यात आले आहेत. या गटामध्ये स्पर्धकाला सहा मिनिटांची वेळ देण्यात आली आहे. दुसऱ्या गटातील विजेत्याला

रोख रक्कम 1501, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे तर द्वितीय क्रमांकासाठी-एक हजार एक रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, आणि तृतीय क्रमांक-777 रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी आपली नावे स्पर्धा नियोजन प्रमुख गुरुनाथ पेडणेकर मो.नं.९४२२४३४४६४,,सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार मो. नं. ९४०३०७३४४४ आणि सौ विशाखा पालव मो. नं. ९४२३२९१५५३ यांच्याकडे सोमवार 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोंदविणे बंधनकारक राहणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांसाठी नियमावली लागू करण्यात आली आहे.गट कमांक १ मध्ये एका प्रशालेतील एकाच स्पर्धकाला सहभागी होता येईल.स्पर्धकाने आपल्या गटासाठी दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर भाषण करावे, आपले भाषण स्वहस्ताक्षरात लिहून आणावे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी साडेनऊ वाजता होणार असून स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती जेष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर, मराठी पत्रकार परिषदेचे माजी राज्य अध्यक्ष गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर यांची आहे. तर पारितोषिक वितरण समारंभास सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर आणि जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे.

स्पर्धा संपताच ताबडतोब पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. तरी या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्पर्धा नियोजन प्रमुख गुरुनाथ पेडणेकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, आणि विद्या विकास मंडळ इन्सुली यांच्यावतीने करण्यात आले आहे.