हळवल रेल्वे उड्डाण पुलाचे काम मार्गी लागणार

भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची माहिती
Edited by:
Published on: January 29, 2025 15:42 PM
views 304  views

कणकवली : मागील अनेक वर्षे शहरानजीक असलेल्या हळवल रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न अखेर खासदार नारायण राणे व पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर हा निकाली लागलेला उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागणार असून पंचक्रोशीतील हळवल, शिवडाव, कळसुली, शिरवळ, आंब्रड, पोखरण -  कुंदे या गावांना रेल्वे फाटकाचा मोठा फटका बसत होता. याबाबतची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी दिली. 

हळवल मार्गाने प्रवास करताना फाटक पडल्यावर होणारा त्रास लक्षात घेत भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. नागरिकांकडून देखील सतत रेल्वे फाटकवरील उड्डाणपुलाची मागणी होत होती. खासदार नारायण राणे व पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी ही बाब गंभीरतेने घेत अखेर सातत्याने होत असलेल्या मागणीला दुजोरा दिला आहे.

त्याचप्रमाणे याबाबत खासदार नारायण राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना सूचना देऊन तात्काळ या संदर्भात पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लागण्यासंदर्भात ज्या बाबींच्या पूर्तता करावयाच्या आहेत, त्या तात्काळ कराव्यात अशा, सूचनाही दिल्या असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी दिली आहे.