अ. भा. मराठी नाट्य परिषद देवगडचा नियोजन मेळावा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 20, 2025 20:17 PM
views 156  views

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात अ.भा.नाट्य परिषदेची शाखा नसल्यामुळे अनेक योजना, सुविधांपासून येथील कलाकार व कलासंस्था वंचित राहिल्या. ही खंत देवगडचे सुपुत्र डाॅ.गणेश उर्फ भाई बांदकर यांना जाणवली व त्यांनी जेष्ठ व श्रेष्ठ कलाकार प्रमोद नलावडे व विद्याधर कार्लेकर यांच्याशी नाट्य परिषद शाखा स्थापनेबाबत चर्चा केली त्यांच्या सकारात्मकतेमुळे देवगडमथील कलाकारांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला नाट्य परिषद शाखेची गरज ओळखून अनेक कलाकार या ग्रुपवर जाॅईन झाले हा हुरुप पहाता यासंबंधी सर्व कलाकारांचा मेळावा घेण्याचे या तिघांनी ठरविले, हा कलाकार मेळावा आज दिनांक 19 जानेवारी रोजी संपन्न झाला.

या कलाकार मेळाव्यात मागील वीस वर्षांचा पुण्यातील नाट्य परिषद व साहित्य परिषद यावरील कार्याचा अनुभव असलेले डाॅ.भाई बांदकर यांनी नाट्य परिषद शाखेसंबधित उद्देश, उपक्रम व फायदे याविषयावर मार्गदर्शन केले ते म्हणाले देवगडमधील कलाक्षेत्रातील अनेक समस्या निवारण एकाच गोष्टीमुळे होवू शकते आणि ते म्हणजे सुसज्ज नाट्यगृह.

यामुळे छोटे छोटे कार्यक्रम होवू लागतील छोट्यातून मोठी नाट्यनिर्मिती होवू शकेल, प्रायोगिक, व्यावसायिक, हौशी नाटके सादर होतील श्रोत्यांना नाट्यपर्वणी मिळेल. बालनाट्ये प्रकाशात येतील पर्यायाने लेखक, कवी, गीत संगीतकार यांना आवडीचे पण कमर्शिअल काम मिळेल, ध्वनी-लाईट संयोजन, नेपथ्य व्यवसायाला चालना मिळेल आणि महत्वाचे म्हणजे आमच्या देवगडमधील सुप्त व अतृप्त कलाकारांना कला सादरीकरणाला वाव मिळेल.सांगण्याचा उद्देश एवढाच की त्यासाठी देवगडला मध्यवर्ती ठिकाणी शासकीय नाट्यगृह व्हायला हवे आणि हे साध्य करु शकणारी ताकद म्हणजे नाट्य परिषद.या नाट्य परिषदेच्या उपक्रमाच्या फायद्याबरोबरच स्थापनेसाठी आवश्यक सभासद नोंदणी व कार्यकारिणी याविषयी विस्तृत माहिती दिली.

या कलाकार मेळाव्यास प्रमोद नलावडे, विद्याधर कार्लेकर, डॉ.राजेंद्र चव्हाण, बंटी कदम, मिलिंद दांडेकर, बाळा कदम, आज्ञा कोयंडे, गुरुनाथ लोंबर व सचिन जाधव व्यासपीठावर होते. सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. या नाट्य परिषद शाखेची कार्यकारीणी ठरविण्यासाठी उपस्थित इच्छुकांना आवाहन करण्यात आले त्यात 35 जणांनी कार्यकारिणीत कार्य करण्याची तयारी दाखवून नावे सादर केली.

आज उपस्थित नसलेल्या पण कलाक्षेत्रात मोठे योगदान असलेल्या इच्छुकांनाही संधी दिली जाणार आहे. कलाक्षेत्रातील अनुभवी जेष्ठ, तरुण, महिला, संस्थाचालक व पत्रकार असे प्रतिनिधी घेवून ही कार्यकारिणी फायनल केली जाणार आहे. देवगडमधील विजयदुर्ग ते फणसगांव, देवगड शहर ते शिरगांव व कुणकेश्वर ते मुणगे अशा सर्वव्यापी जागांवरुन कार्यकारिणी सदस्य व सभासद नेमले जाणार आहेत.

प्रस्तावना प्रमोद नलावडे व विद्याधर कार्लेकर यांनी व आभार सौ.तन्वी चांदोस्कर यांनी केले. या मेळाव्यास मान्यवर कलाकार बहुसंख्येने उपस्थित होते.