
दोडामार्ग : जिल्ह्यात एकमेव दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात भारत सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत नागरिकांनाजमीन मिळकतीचा 'सनद वाटप' कार्यक्रम शनिवारी सपन्न झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात ऑनलाईन सनद वाटप कार्यक्रम निमित्ताने त्याचे थेट प्रेक्षपण मोर्ले येथील ग्रामस्थांना दाखवत येथेही हा कार्यक्रम संपन्न झाला.
प्रधानमंत्री मोदी यांनी देशभरातील विविध भागातील लाभार्थीशी यावेळी संवाद साधला. या कार्यक्रमावेळी मोर्ले येथील ११ लाभार्थ्यांनी सनद फी भरणा करुन आपल्या मालमत्तेची सनद प्राप्त करुन घेतली. भूमि अभिलेख व ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात गावठाण क्षेत्र असणाऱ्या गावांमध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते. सदर योजनेमुळे वर्षानुवर्षे गावठाण क्षेत्रात राहणाऱ्या जमीन धारकांना त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून सनद व तद्नंतर मिळकत पत्रिका प्राप्त होणार आहेत. या योजनेचे महत्व व सनद प्राप्त करून घेण्याचे फायदे याबाबतही विनायक ठाकरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शने केले.
यावेळी भूमि अभिलेखचे जिल्हा अधीक्षक सूजितकुमार जाधोर, दोडामार्ग भूमि अभिलेखचे उप अधीक्षक विनायक ठाकरे, त्यांचे सहकारी तसेच मोर्ले गावचे उपसरपंच संतोष मोयें, सत्यवान बेर्डे, श्रीम. दिव्या गवस व इतर ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, मोर्ले, ग्रामपंचायत अधिकारी देवेंद्र कसालकर यांसह दोडामार्ग कार्यालयाचे श्रीराम नेवगी, महेश सरमळकर, रविंद्र चव्हाण, अय्याज शेख, विश्वजीत सावंत , आनंद धोपटे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. कसालकर यांनी केले.
भूमि अभिलेख चे अधिकारी श्री. जाधोर व श्री. ठाकरे यांनी ग्रामस्थांना स्वामित्व योजना व त्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले, उपसरपंच श्री. मोर्ये यांनी लवकरच उर्वरित लाभार्थी हे सनद फी भरणा करुन मोर्ले गाव १००% सनद फी वसुली करुन जिल्हयात आपला नावलौकीक कायम राखील असे आश्वाशीत केलं.